अभिनेता गौरव खन्ना सध्या ‘बिग बॉस 19’ मध्ये आहे. गौरवला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. गौरव त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पर्धकांशी घरात बोलताना दिसतो. गौरवच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत, पण त्याला व त्याच्या पत्नीला अद्याप बाळ नाही याबद्दल नुकतंच त्याने मत व्यक्त केलं होतं. आपल्याला बाळ हवंय, पण पत्नी तयार नसल्याचं तो शोमध्ये म्हणाला होता. त्यानंतर आता गौरवच्या पत्नीने केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
गौरव खन्नाच्या पत्नीचे नाव आकांक्षा चमोला आहे. आकांक्षाने पती बिग बॉसच्या घरात गेल्यावर एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत गौरव बिग बॉसमध्ये गेल्यानंतर घरात शांतता असल्याचं म्हटलं आहे. आकांक्षा म्हणाली, “मी खूप शांततेत राहत आहे. मी माझ्या घरी जेवण बनवणाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे. मी एकटी असल्याने सध्या घरी जेवण बनवतच नाहीये.”
‘मैं पत्नी हूं’
आकांक्षाला विचारण्यात आलं की गौरव खरोखरच ‘ग्रीन फॉरेस्ट’ (चांगला पती) आहे का? यावर आकांक्षा टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “हो! तो ग्रीन फॉरेस्ट असल्याचा खूप चांगला अभिनय करत आहे. (हसते) मी त्याची पत्नी आहे. प्रत्येक पत्नीला आपल्या पतीमध्ये दोष दिसतात, मग तुमचा पती गौरव खन्ना असो वा अनुज कपाडिया (गौरवने मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे नाव असो.”
आकांक्षाला आवडत नाही गौरवची ही गोष्ट
गौरवची कोणती गोष्ट आवडत नाही, याबद्दल विचारल्यावर आकांक्षा म्हणाली, ‘एक गुण!!! खरं तर त्याच्या जेवणाबद्दलच्या विशिष्ट सवयी आहेत. त्याच्यासाठी जेवण खूप महत्त्वाचं आहे. त्याचे सगळे मूड जेवणावर अवलंबून असतात. जर त्याला वेळेवर जेवण मिळालं नाही तर तो चिडचिड करतो. त्याला चविष्ट जेवण मिळालं नाही तर तो भडकतो. खरं तर ही मोठी समस्या नाही, पण कधीकधी ती मोठी समस्या बनते.”
बाळ नसण्याबद्दल गौरव खन्नाने केलेलं वक्तव्य
मृदुलने गौरवला बाळाबद्दल विचारलं होतं. त्यावर “नोव्हेंबरमध्ये लग्नाला ९ वर्षे होतील. माझ्या पत्नीला (आकांक्षा चमोला) मुलं नको आहेत. मला मुलं हवी आहेत. पण आमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे ती जे म्हणेल ते ऐकावं लागेल. प्रेम केलंय तर साथ द्यावी लागेल ना,” असं गौरव म्हणाला होता.