Gaurav More New Mhada Home At Powai Filterpada : विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गौरव मोरेने नुकतीच त्याच्या तमाम चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडा लॉटरीमध्ये गौरव मोरेला पवईत घर मिळाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. अखेर या नव्या घराचा ताबा गौरवला मिळाला असून २५ सप्टेंबरला आपल्या कुटुंबासह फिल्टरपाड्याच्या बच्चनने हक्काच्या फ्लॅटमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं.

नव्या घराचा ताबा मिळाल्याची आनंदाची बातमी गौरवने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. गौरव आजच्या घडीला स्टार असला तरीही एक काळ असा होता जेव्हा त्याने अतिशय कष्ट करून दिवस काढले आहेत. तेव्हा केलेल्या मेहनतीची जाणीव त्याला आजही आहे. ताडपत्रीच्या घरात गौरवचं बालपण गेलं होतं. पण, हे कठीण दिवस नक्कीच बदलतील आणि आपलं या मायानगरीत हक्काचं घर असेल, असा विश्वास त्याच्या मनात होता आणि फिल्टरपाड्याच्या बच्चनचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

सध्या मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आपलं हक्काचं घर देण्यासाठी म्हाडाची लॉटरी काढली जाते. अवघ्या काही घरांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज केले जातात. यामध्ये कलाकारांचा देखील समावेश असतो. २०२४ च्या लॉटरीत पवईमधली दोन घरं गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना मिळाली आहेत. पवईत हक्काचं मोठं घर घेणार हे गौरवचं स्वप्न होतं. यापूर्वी त्याने अनेक मुलाखतींमध्ये याबद्दल खुलासा केला होता. अखेर त्याची स्वप्नपूर्ती म्हाडाच्या लॉटरीच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. घराचा ताबा मिळाल्यावर गौरवने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

गौरव मोरेची पोस्ट

(ताडपत्री ते फ्लॅट)
फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे लागली आहेत. जिथे राहतो तिथेच आपलं घर असावं हे कायम मनात होतं. लहानपणापासून वाटत होतं जिथे राहतो… तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आणि काल दिनांक २५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला.

ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. घरच्यांना त्या नव्या घराचा आनंद घेताना बघून मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फिल्टर पाडा आणि पवईसह जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही.
माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी म्हाडाचे मनापासून आभार मानतो.

दरम्यान, गौरव मोरेच्या या पोस्टवर ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, प्रथमेश परब, अभिजीत खांडकेकर, निमिष कुलकर्णी, क्षितीज पटवर्धन अशा अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता गौरवच्या या नव्या घराची संपूर्ण झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.