Geeta Kapoor Reveals Reality Shows Truth : रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेकदा आपल्याला दिसणारी दृश्य किंवा नाट्य हे घडवून आणलेलं असतं. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सतत बदल घडवणं हे जरूरी असतं. हे बदल प्रामुख्याने भावनिक किंवा मनोरंजनाच्या हेतूने घडवून आणले जातात. भावनिक विषयाला हात घातला की, प्रेक्षक शक्यतो रिमोटला हात लावत नाहीत. त्यामुळेच गरीबी हा विषय रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून खूप वाहवा मिळवतो. त्यामुळे असे भावनिक क्षण अनेकदा तयार केले जातात आणि यामुळे रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असल्याच्या चर्चा होताना दिसतात.

रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याबाबत याआधी अनेक वादविवाद झाले आहेत. शोमधील स्पर्धक किंवा परीक्षकांनी याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही जण रिअ‍ॅलिटी शो हे स्क्रिप्टेड असतात असं ठामपणे सांगितलं आहे. तर काही जण मात्र या रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याला विरोध करतात. अशातच बॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका गीता कपूरने रिअ‍ॅलिटी शोबद्दल नुकतंच एका पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी तिने रिअ‍ॅलिटी शोमध्ये काही गोष्टी स्क्रिप्टेड असल्याचे म्हटलं

गीता कपूरने नुकतीच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये तिने रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं. यावेळी हर्षने असं म्हटलं की, “तुम्ही टीव्हीवर एखादा रिअ‍ॅलिटी शो बघताना पाच कामे करत असता. शोमध्ये जे झालेलं असतं ते एडिट करुन तुम्हाला दोन मिनिटांत दाखवलं जातं. पण आमच्यासमोर ते अर्धा तास झालेलं असतं. त्यामुळे आम्हाला रडू येतं. कारण एखाद्या माणसाची कहाणी अर्धा तास जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला रडू का येणार नाही?”

तर याबद्दल गीता कपूर म्हणाली की, “त्या स्पर्धकांची काहाणी खरी असेल तर तुम्हाला नक्कीच रडू येतं. कारण तुम्ही जबरदस्तीने रडू शकत नाही. खूप लोक विचारतात की, हे रिअ‍ॅलिटी शो खरंच रीअल असतात का? कधी कधी शोमध्ये काही पाहुणे कलाकार येतात आणि ते असं काही तरी पाहून रडतात. तेव्हा ते म्हणतात की, आम्हाला वाटलं की हे स्क्रिप्टेड असतं. हो! काही गोष्टी स्क्रिप्टेड असतात. कारण त्या शोची गरज असतात.” यापुढे त्यांनी ‘बिग बॉस’बद्दल म्हटलं की, “आम्ही तरी बारा तास शूटिंग करतो; पण ‘बिग बॉस’सारख्या शोमध्ये तर २४ तास कॅमेरे सुरू असतात. मग तिकडे कोणी कसं अभिनय करु शकतं?”

यानंतर हर्षने लेखक म्हणून त्याचं रिअ‍ॅलिटी शोबद्दलच मत व्यक्त करताना म्हटलं की, “एखाद्या स्पर्धकाचा प्रवास प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी त्याचा प्रवास वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणावा लागतो. त्यामुळे कदाचित स्क्रिप्टेड वाटू शकतं. पण ते करावंच लागतं.” याबबद्दल गीताने म्हटलं की, “मला वाटतं लेखक म्हणून तू हे समजू शकतोस. पण प्रेक्षकांना ते कळणार नाही. पण याचं श्रेय लेखकांना गेलं पाहिजे. कारण एका स्पर्धकामध्ये टॅलेंट आहे; पण त्याची पार्श्वभूमीसुद्धा माहीत होणं गरजेचं आहे.”

यानंतर गीता कपूरने सांगितलं की, “लोक कितीही म्हणाले की, आम्हाला डान्सच पाहायचा आहे. पण तरीही प्रत्येकाची गोष्ट जाणून घेण्यातही त्यांना तितकाच रस असतो. कारण कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे डोकावून बघण्यात आपल्यालासुद्धा आवडतं. नाहीतर त्याशिवाय ‘बिग बॉस’सारखा शो चाललाच नसता.”