Marathi Actor On Mumbai Ganeshotsav : राज्यभरात गणेशोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी सुद्धा लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपतीच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरीसुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे.

गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार त्यांच्या आनंदी भावना व्यक्त करत आहेत. तसंच या गणेशोत्सवाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच आता मराठी अभिनेता उदय नेनेने मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदय ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्याने नुकतीच NP Creation ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “उत्सव हे साजरे व्हायलाच पाहिजेत, त्यात काय वाद नाही. पण त्याचं स्वरूप सध्या अक्राळ-विक्राळ आहेत. उत्सव हे साजरे व्हायला पाहिजेत. मिरवायचे नाहीत. मुंबईत उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे कल जास्त आहे. यात राजकारणी किंवा कोणती संस्था जबाबबदार आहे, असं वाटत नाही. त्याला सर्वस्वी तुम्ही, आम्ही आपण नागरिकच जबाबदार आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव हे विभागात एकच असला पाहिजे. पण हल्ली एका गल्लीत चार गणेशोत्सव मंडळं असतात. चार डिजे वाजत असतात. सगळं ट्रॅफिक जाम असतं. कितीतरी जीवांना अडचण होत असते. जर तो उत्सव सार्वजनिक आहे. तर त्यात एक-दोन किलोमीटरचं अंतर असलं पाहिजे. म्हणजे त्याचं मांगल्य आणि भव्यता जपली जाईल. तिकडे जाऊन तो बाप्पा पहावा असं लोकांना वाटेल.”

यानंतर उदय म्हणतो, “मी माझ्या बिल्डिंगमधून खाली उतरले की, चार गणपती आहेत. मग मला ती अडचण वाटते. मुंबईसारख्या ठिकाणी जिथे सार्वजनिक रस्ते, ठिकाणे आधीच कमी आहेत, अशा शहरांबद्दल विचार केला पाहिजे. २५ फुट मूर्त्यांची काय गरज आहे? बरं, ठीक आहे; आपला सण आहे. पण मग अशा चारच मूर्ती शहरात असायला हव्यात ना? जेणेकरुन लोक ते जाऊन बघतील. प्रत्येक गल्लीचा आता एक राजा झाला आहे. माझ्या गल्लीत २५ फुटाचे मूर्ती, माझ्या बाजुच्या गल्लीत २५ फुटाची मूर्ती… असं करुन निसर्गाची किती हानी होत आहे. पण याचऐवजी जर पूर्ण मुंबईत चारच मूर्ती असतील तर किती मजा येईल. हल्ली मी बघतो, की पूर्वी गायन, वक्तृत्व, नाटक, वादविवाद अशा काही स्पर्धा व्हायच्या. पण आता हे प्रमाण फार कमी झालं आहे. कुठला तरी एक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक माध्यम होतं. पण आता सोशल मीडियामुळे त्याची गरज उरलेली नाही. मग हा फक्त दिखावा आहे असं वाटतं.”

यापुढे अभिनेता असं म्हणतो, “आपले सण, आपले उत्सव याविषयी आपण सजग राहिलं पाहिजे. तुम्ही-आम्ही विचार केला तर फरक पडू शकतो. तुम्ही-आम्ही मंडळाचे भाग असतोच की, आपण इतकी मोठी मूर्ती नको असं म्हणायला पाहिजे. आता आगमन सोहळे होतात. याआधी कुठे होते? बरं मग तुम्हाला करायचं असेल तर ते फक्त मंडळांपुरतंच असावं. लोक नाचत असतात, ठीक आहे. त्यावर माझा आक्षेप आहे. मुखदर्शन, पाद्यपूजन… हे काय आहे. मग त्याचं मार्केटिंग करायचं. मग मला वाटतं. याची खरंच गरज आहे का? मुंबईसारख्या ठिकाणी तरी हे गरजेचं आहे का?”

यानंतर उदय असं म्हणाला, “मला वाटतं की, आपण नागरिक म्हणून विचार केला पाहिजे आणि आपल्या मंडळांना याबद्दल बोललं पाहिजे. दोन-तीन करोडचे सजावट आणि डेकोरेशन असतात. त्याची गरज आहे का? आपले सण लोकांना त्रास देणार नाहीत किंवा सण म्हटल्यावर लोकांच्या मनात चांगली भावना निर्माण व्हायला हवी असं वागायला पाहिजे. हे मी मुंबईपुरतं बोलत आहे. मुंबईची सणांबद्दल आता मला भीती वाटत आहे. काळजी वाटते की, आपल्या सणांमुळे लोकांना त्रास होणार नाही ना? आज अनंत चतुर्दशी असेल तर, दुसऱ्या दिवशीसुद्धा विसर्जन सुरू असतं. या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे.”