GharoGhari Matichya Chuli Promo : ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेत कोर्ट ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये ऐश्वर्याने जानकीवर खोटे आरोप केलेले असतात, जे जानकी व सौमित्र खोटं सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतात; यासाठी संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र प्रयत्न करताना दिसतात.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्याने एकीकडे जानकीवर तिच्या आईला मारल्याचा खोटा आरोप केलाय तर दुसरीकडे तिच्या आईला एका ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेलं असतं. अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये ऐश्वर्याने संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर मोठं संकट उभं केलं असून ती त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देताना दिसते.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ट्विस्ट
समोर आलेल्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये ऐश्वर्याचे वकील “आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते बघून तुमची खात्री पटेल की एका घरात सगळी सासरची मंडळी मिळून कसा स्त्रीवर अन्याय करतात,” असं म्हणतात. यावेळी जानकीने ऐश्वर्याला रणदिवे कुटुंबातून बाहेर काढतानाचा व्हिडीओ पाहायला मिळतो. त्यानंतर ऐश्वर्या “जज साहेब तुम्ही पाहिलंत ना, या लोकांनी मला कसं मारत मारत घरातून बाहेर काढलंय आणि त्यामुळेच मी संपूर्ण रणदिवे कुटुंबावर माझा छळ केल्याची केस करतेय,” असं म्हणताना दिसतेय.
प्रोमोमध्ये ऐश्वर्या पुढे रणदिवे कुटुंबाला “मिळालेल्या साक्षी पुराव्यानुसार संपूर्ण रणदिवे कुटुंब खाणार तुरुंगाची हवा” असं म्हणते. यावर जानकी तिला, “तुझा खोटारडेपणा बाहेर काढण्यासाठी मी तुरुंगच काय सुरुंग लावायलाही कमी नाही करणार” असं प्रतीउत्तर देताना दिसते आणि रागात तिथून बाहेर जाते, त्यामुळे आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत पुढे नेमकं काय घडणार; जानकी स्वत:ला कोर्टासमोर सिद्ध करू शकेल का आणि यासह ती ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार, हे सगळं मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून हा प्रोमो शेअर करत याला “ऐश्वर्याने उभ्या केलेल्या या संकटातून जानकी तिच्या कुटुंबाला कसं बाहेर काढणार…?” अशी कॅप्शन दिली आहे, त्यामुळे आता मालिकेत जानकी व तिच्या आईची भेट कशी होणार, ती स्वत:वर झालेले आरोप खोटे कसे ठरवणार हे पाहणं रंजक ठरेल. या मालिकेचा हा भाग शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पाहायला मिळणार आहे.