GharoGhari Matichya Chuli Serial New Promo : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या मोठं वळण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत ऐश्वर्या व हृषिकेश यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिलतं. ऐश्वर्याकडून आपल्या आईचा पत्ता वदवून घेण्यासाठी जानकी हृषिकेश-ऐश्वर्या यांच्या लग्नासाठी तयार होते. तर दुसरीकडे ऐश्वर्या देखील तिला शक्य तितकी कट कारस्थानं करुन हृषिकेशबरोबर लग्न करण्याच्या प्रयत्नात असते. अशातच आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

सारंगचा मृत्यू झाला आहे असा डाव जानकी व इतर मंडळी रचतात जेणेकरुन त्यांना ऐश्वर्याला त्यांच्या जाळ्यात अडकवता येइल. परंतु, त्याचा मृत्यू झालेला नसतो आणि ऐश्वर्या व हृषिकेश यांच्या लग्नाच्या वेळी जानकी सारंगला तिच्यासमोर घेऊन येते आणि तिचं हृषिकेशबरोबर लग्न करण्याचं स्वप्न उधळून लावते असं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

जानकी उधळून लावणार ऐश्वर्याचं स्वप्न

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये ऐश्वर्या व हृषिकेश लग्नासाठी उभे असतात. त्यावेळी ऐश्वर्या मनातल्या मनात आज होणार मी हृषिकेशची बायको असं म्हणताना दिसते. परंतु, तेवढ्यात अंतरपाट समोरुन काढल्यानंतर तिला तिथे हृषिकेशच्या जागी सारंग उभा असलेला दिसतो. तेव्हा जानकी म्हणते, “घाबरू नको सारंग भावोजी फक्त तुला नाही तर आम्हा सगळ्यांना दिसतायत.” त्यानंतर हृषिकेश म्हणतो, “कारण सारंग जिवंतं आहे.”

जानकी पुढे “तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना, आता मी तुला तोडेन” असं म्हणते. त्यानंतर जानकी व ऐश्वर्यामध्ये भांडण होतं आणि ती ऐश्वर्याला म्हणते “हा वार माझ्या घरच्यांना तोडण्यासाठी आणि हा तुला अद्दल शिकवण्यासाठी.” त्यानंतर जानकी तिला घराबाहेर काढते आणि “तुझी जागा इथेच आहे ऐश्वर्या आमच्या या घरात तुला जागा नाही.” असं म्हणताना दिसते.

समोर आलेल्या प्रोमोनुसार येत्या २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान या मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार असून अखेर जानकी ऐश्वर्याचं स्वप्न उधळून लावणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. परंतु, यादरम्यान ती तिच्या आईपर्यंत कशी पोहोचणार आणि ऐश्वर्या व हृषिकेशचं लग्न नेमकं कसं थांबवणार हे पाहणं रंजक ठरेल.