Samruddhi Kelkar Talks About Her Mother : समृद्धी केळकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समृद्धी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्यामार्फत ती मालिकेच्या सेटवरील गमती जमती तसेच खऱ्या आयुष्यातील घडामोडींबद्दलची माहिती प्रेक्षकांबरोबर शेअर करत असते. अशातच आता तिने तिच्या आईची आठवण सांगितली आहे.
समृद्धीने विविध मालिकांमध्ये काम करत तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. अशातच यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आईची आठवण सांगितली आहे. समृद्धीने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईच्या निधनानंतर तिने त्यांचे दागिने जपून ठेवल्याचं म्हटलं आहे.
समृद्धी मालिकेत कृष्णा हे पात्र साकारत असून कृष्णा व दुष्यंतचं नुकतंच लग्न झाल्याचं पाहायला मिळालं. लग्नानंतर कृष्णाच्या लूकमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. आता कृष्णा साडी नेसते व त्यानुसार दागिनेही परिधान करते. यावेळी तिने तिच्याकडे दागिन्याचं कलेक्शन असल्याचं सांगितलं आहे. समृद्धी म्हणाली, “माझ्याकडे खूप दागिने आहेत. मी मालिकेतील सिक्वेन्सनुसार दागिने सेटवर घेऊन येत असते आणि जर ते वापरण्याची परवानगी मिळाली तर मी ते परिधान करते.”
समृद्धी केळकरची आईच्या दागिन्यांबद्दल प्रतिक्रिया
समृद्धीने पुढे तिच्याकडे तिच्या आईचे दागिने असल्याचं म्हणत त्यांची झलकही दाखवली आहे. यावेळी तिने दागिन्यांची आठवण सांगितली आहे. समृद्धीने यावेळी तिच्या आईचे ८-९ वर्षांपूर्वीचे दागिने दाखवत सांगितलं की, “हा माझ्या आईचा सेट आहे. तो मी खूप जपून ठेवलाय. माझा आवडता दागिना आहे हा. तो खूप नाजूक आणि छान आहे.” समृद्धीला पुढे हे दागिने किती वर्ष जुने आहेत विचारल्यानंतर तिने सांगितलं की, “खूप जुने आहेत. हे जवळपास ८-९ वर्ष जुने दागिने आहेत.”
समृद्धीने यावेळी मुलाखतीत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेच्या सेटवरील तिच्या मेकअप रूमची झलक दाखवली आहे. यावेळी तिने ती सेटवर येताना तिचे बाबा तिला त्यांच्या हाताने बनवलेलं जेवण डब्यात भरून देतात असं सांगितलं आहे. समृद्धीचं ती, तिची बहीण व वडील असं कुटुंब आहे. समृद्धीच्या बहिणीला एक मुलगा असून ती तिच्या भाच्याबरोबरचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.