Hina Khan Breaks Down As She Talks About Her Battle with Cancer : अभिनेत्री हिना खान सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. सोनाली बेंद्रे सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल सहभागी झाले आहेत, त्यामुळे यामध्ये हिनाने नवऱ्यासह जोडीने सहभाग घेतला आहे. परंतु, कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवणारी अभिनेत्री हिना खानच्या आयुष्यात २०२४ मध्ये मोठं संकट आलं होतं. अभिनेत्रीला अवघ्या तारुण्यात कर्करोगाचं निदान झालं होतं. परंतु, परिस्थितीसमोर न डगमगता तिने त्यावर उपचार घेत पुन्हा अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. आता ती ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात नवऱ्यासह सहभागी झाली आहे. सोनाली बेंद्रे व मुनव्वर फारुकी याचं सूत्रसंचालन करत आहेत.

नवऱ्याचं कौतुक करताना हिना खानला अश्रू अनावर

कार्यक्रमाच्या नवीन प्रोमोमध्ये हिना खानला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतं. यावेळी तिला कर्करोगाच्या प्रवासाबद्दल सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते. नवऱ्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “हा माझ्यासाठी खूप करतो. जेव्हा तुम्ही एका भावनिक प्रवासातून जात असता, तेव्हा त्या जोडीदारासाठी एका स्त्रीला तिच्या सर्व दोषांसह स्वीकारून तिच्यासह लग्न करणं खूप अवघड असतं.” यावेळी तिने तिला झालेल्या कर्करोगाबद्दल सांगितलं आहे.

हिनाचा नवरा रॉकी पुढे यावर म्हणाला, “जर दोष असे असतील तर मी १० वेळा तुझ्यासह लग्न करेन.” हे ऐकून रडत असलेली हिना स्मित हास्य करताना दिसली. यावेळी सोनाली बेंद्रने टाळ्या वाजवत रॉकीचं कौतुक केलं.

दरम्यान, हिना व रॉकी यांची पहिली भेट तिची लोकप्रिय मालिका ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’च्या सेटवर झाली होती आणि १३ वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. ४ जून रोजी त्यांनी मुंबईत लग्न केलं. त्यांच्या लग्नातील फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.