Hina Khan’s Husband Rocky Jaiswal Broke Silence On Trolling : अभिनेत्री हिना खान व तिचा नवरा रॉकी जैस्वाल हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघेही एकाच क्षेत्रात कार्यरत असले तरी दोघांची कामं वेगळी आहेत. हिना पडद्यावर, तर रॉकी पडद्यामागे काम करतो. अशातच नुकतंच रॉकीनं तो व त्याची बायको हिना खानच्या प्रसिद्धीचा वापर करतो, असं म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
रॉकीनं नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यानं त्याची मतं मांडत ट्रोल करणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीत त्यानं त्याच्या खासगी आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दलही सांगितलं आहे. त्यामध्ये त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या निधनाबद्दल सांगितलं. तसेच त्याला लहानपणी म्हणजे तो आठ-नऊ वर्षांचा असतानाच पैशांचं महत्त्व कळलं असल्याचं म्हटलं आहे.
हिना खानबद्दल रॉकी जैस्वालची प्रतिक्रिया
मुलाखतीत रॉकीला प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जोडीदाराबद्दल, तसेच त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते याबाबत विचारण्यात आलं होतं. तो म्हणाला, “लोक म्हणतील की, मी हिनाच्या प्रसिद्धीचा, तिच्या पैशांचा माझ्या फायद्यासाठी वापर करतो. पण ते असं म्हणतात; कारण- त्यांना त्यांच्या आयुष्यात जे करायचं होतं, ते मी केलं आहे.”
रॉकी पुढे म्हणाला, “मी खूप स्पष्टपणे सांगतो, मी हिनाएवढे पैसे नक्कीच कमवत नाही. ती स्टार आहे. मला तिच्या सेलिब्रिटी असण्याचा फायदा होतो का, तर हो नक्कीच होतो. पण, म्हणून या कारणामुळे आम्ही एकत्र नाहीये. मला या गोष्टीची अजिबात काळजी वाटत नाही. कारण- मला माहीत आहे की, जर मी हिनाबरोबर कुठे गेलो, तर तिला जास्त लोक ओळखणार, तिच्यावर प्रेम करणार, तिला जास्त प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळणार. पण, यामुळे मला राग का येईल, मला का काळजी वाटेल? माझं तिच्यावर प्रेम आहे; पण तिला लोक ओळखतात यामुळे नाही. माझ्या मते- फक्त एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं जास्त महत्त्वाचं आहे.”
दरम्यान, रॉकी जैस्वाल सध्या ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात त्याची बायको हिना खानसह सहभागी झाला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली बेंद्रे व मुनव्वर फारुकी करीत आहेत.