मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकाचा अपघात झाला आहे. ‘इंडियन आयडॉल’मधून प्रसिद्धीझोतात आलेला गायक पवनदीप राजनचा आज सोमवारी कार अपघात झाला. पहाटे ३:४० या वेळेदरम्यान हा अपघात झाला. पवनदीपचा अपघात झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पवनदीपला मोठी दुखापत झाल्याचं दिसतं. मध्येप्रदेश येथे हा अपघात झाला आहे. कार अपघातात पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचं समजतं. अद्याप याबद्दलची सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
पवनदीपचा अपघात झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर या व्हिडीओखाली कमेंटमध्ये पवनदीपचे चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत; तर काही दिवसांपूर्वीच पवनदीपने २७ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर पवनदीपचा अपघात झाल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे.
पवनदीप राजन ‘इंडियन आयडॉल’ सिजन १२ चा विजेता ठरला होता. ‘इंडियन आयडॉल’च्या १२व्या पर्वाची ट्रॉफी जिंकल्यानंतर पवनदीपला २५ लाखांचं मानधन व एक चारचाकी गाडी बक्षीस स्वरूपात मिळाली होती. पवनदीपसह अरुणिता कांजीलाल ही पहिल्या क्रमांकाची, तर सायली कांबळे दुसऱ्या क्रमांकाची दावेदार ठरली होती.
या कार्यक्रमादरम्यान पवनदीपने विविध गायकांची प्रसिद्ध गाणी गात परीक्षकांची व चाहत्यांची मनं जिंकली, त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग आहे; तर हे पर्व विशेष गाजलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे देशभरातून पवनच्या गाण्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला, तर पवनदीपने यानंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पांघरुण’ या चित्रपटासाठी ‘सतरंगी झाले रे’ हे गाणं सुरबद्ध केलं होतं.
दरम्यान, पवनदीपच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचे झाले तर पवनदीप राजन हा मुळचा उत्तराखंडचा असून पवनदीपचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे उत्तराखंड येथे झालं आहे. पवनदीपचे आई-बाबा, बहीण असं कुटुंब आहे; तर त्याच्या घरात सर्वांना कलेची आवड असलेली पाहायला मिळते.