Indrayani fame Kanchi Shinde: कलाकार त्यांच्या कारकिर्दीत विविध धाटणीच्या, विविध छटा असलेल्या भूमिका साकारतात. अनेकदा त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असलेल्या, कल्पनेतील भूमिका साकारताना त्यांना स्वत:च्या मनाची तयारी करावी लागते.
मालिकांमधील कलाकार दररोज काहीतरी वेगळे करताना दिसतात. अनेकदा या कलाकारांना मोठमोठ्याने ओरडावे लागते. रडावे लागते, भांडावे लागते. कलाकार अनेकदा त्यांचे अनुभव मुलाखतीमध्ये सांगतात. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील व्यक्त करतात.
“शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा…”
आता इंद्रायणी मालिकेत इंद्रायणी ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री कांची शिंदेने एका सीनचा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर मालिकेतील शूटिंगदरम्यानचा एक सीन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते की तिला कोणीतरी काळ्या रंगाचे काहीतरी फेकून मारते.
तिच्या चेहऱ्यावर काळा रंग लागला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर इंद्रायणी पदर खोचून उभी राहते आणि संतापाने म्हणते की कोण आहे रे? समोर या ना. अरे भ्याडांसारखे बायकांवर हल्ले काय करता? तुम्हाला काय वाटतं, अशा हल्ल्याने मी मोडेन? तुम्ही जितका मला खाली गाढायचा प्रयत्न कराल, तितकी मजबूत मी तुमच्या पुढे उभी राहीन. या समोर सोडत नसते मी कोणाला” त्या सीननंतर कांची रडत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी पुन्हा मालिकेतील एक सीन पाहायला मिळतो. जिथे ती देवी आंबाबाईचा जयघोष करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, “माझ्या आयुष्यातील सगळ्यात अवघड सीन आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा अवघड सीन आहे. साडेचार तास सतत पाण्यामध्ये होते. थंडी, उष्णता, मोठा आवाज, रडू, राग, हसू, त्रागा आणि समाधान सगळं या सीनमध्ये केलं. देवी होणं सोपं नाही.”
कांची शिंदेच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. “खूपच छान. तुझा अभिमान वाटतो. आजकाल असा अभिनय पाहायला मिळत नाही. डोळ्यात पाणी आलं”, “अंगावर काटा आला”, “बेस्ट सीन”, “तुझा अभिमान वाटतो”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.



दरम्यान, इंद्रायणी मालिकेत आगामी काळात नेमके काय ट्विस्ट येणार, पुढे काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
