Indrayani Serial: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’मध्ये आता नवा प्रवाह सुरू होतं आहे. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ, विचारी, मार्मिक प्रश्नांनी मोठ्यांना अचंबित आणि निरूत्तर करणारी इंदू आता मोठी झाली आहे. त्यामुळे चिमुकल्या इंदूचा प्रवास संपला असून आता मोठ्या इंदूला नव्या आव्हानांसाठी तयार व्हायला लागणार आहे. नुकताच ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामधून मोठ्या इंद्रायणीचा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंदूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर गोपाळच्या भूमिकेत चिन्मय पटवर्धन आणि अधू निशांत पवार असणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अनिता दाते, स्वानंद बर्वेसह हे नवे चेहेरे झळकले आहेत. १० मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता मोठ्या इंद्रायणीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे.

कांची शिंदेचा आज वाढदिवस आहे. याच दिवशी ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानिमित्नाने कांचीने ‘कलर्स मराठी’चे आभार व्यक्त केले. कांची म्हणाली, “माझं स्वप्न पूर्ण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जेव्हा छोट्या इंदूचा प्रोमो आला होता तेव्हापासून माझी इच्छा होती की, जेव्हा कधी छोटी इंदू मोठी होईल तेव्हा ते पात्र माझ्या नशीबात यावं आणि माझ्या पदरी पडावं. तेच झालं. या गोष्टीमध्ये विठ्ठूरायाने माझी साथ केली. ‘कलर्स मराठी’ने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आज माझ्या वाढदिवशी ‘कलर्स मराठी’ने मला सुंदर गिफ्ट दिलं आहे.”

पुढे कांची शिंदे म्हणाली, “या पात्रासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी लोककला शिकले आहे. भारूड, जागरण, गोंधळ, कीर्तन या सगळ्यांची ओळख मला लहानपणापासून झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर आहे. गायनात माझा जो बाज आहे तो मला या मालिकेत नक्कीच मदत करत आहे. कीर्तन करताना मला उपयोगी पडतो आहे. किर्तनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मी खूप शिकते आहे. एक माणूस म्हणून पण माझ्यात बदल होतो आहे. इंदूमध्ये किती आपलेपणा आहे. विठूरायाबद्दलची तिची जी भक्ती आहे ती वाखाण्याजोगी आहे. लहान इंदू खूपच निरागस आहे ती काहीच ठरवून करत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कांची शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कांचीने ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत चमकी ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. कांची सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती लावणी वर्कशॉप घेते. कांचीने अनेक लावणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या लावणी आणि अदांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे आता कांचीने साकारलेली इंद्रायणी प्रेक्षकांची मनं जिंकते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.