Jay Bhanushali & Mahi Vij Divorce Rumours : हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे जय भानुशाली. जय व अभिनेत्री माही विज यांनी १५ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. परंतु, काही दिवसांपासून या जोडीच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. अशातच आता ही जोडी घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
जय भानुशाली व माही विज यांनी मालिकांमध्ये नायक व नायिका म्हणून काम केलं आहे. तर, जय अनेकदा रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसतो. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या जोडीनं २०१० मध्ये लग्न केलं होतं आणि त्यांना तारा नावाची एक गोंडस मुलगीदेखील आहे. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबर रील, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे. त्यांच्या लेकीबरोबरचेही रील सोशल मीडियावर व्हायरल व्हायच्या.
जय व माही घेणार घटस्फोट?
जय आणि माही दोघांनी काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकही पोस्ट किंवा फोटो एकमेकांबरोबर शेअर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टखाली अनेकदा दोघे वेगळे झाले आहेत का, त्यांच्यामध्ये दुरावा आला आहे का अशा कमेंट्स नेटकरी करताना दिसतात. अशातच आता या जोडीच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं म्हटलं जात आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार जय व माही यांच्या मुलीच्या कस्टडीबद्दलही निर्णय घेण्यात आला आहे. माहीला जयबद्दल अविश्वास वाटू लागल्यानं या सगळ्याची सुरुवात झाल्याचं म्हटलं जातंय. पूर्वी एकत्र अनेक ब्लॉग, रीला फोटो पोस्ट करणारी ही जोडी आता सोशल मीडियावर एकमेकांबद्दल काहीच पोस्ट करीत नाही. २०२४ मध्ये त्यांनी शेवटची एकत्र पोस्ट शेअर केलेली. दोघेही शेवटचं त्यांच्या लेकीच्या ताराच्या वाढदिवसाला ऑगस्टमध्ये एकत्र दिसले होते.
घटस्फोटाच्या चर्चांबद्दल माहीने दिलेली प्रतिक्रिया
माहीने जयबरोबरच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत प्रतिक्रियाही दिलेली. त्यांच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाल्यानंतर तिनं ‘मेल फॅमिनिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत “जरी असं काही असलं तरी मी तुम्हाला त्याबद्दल का सांगू? तुम्ही माझे काका आहात का? तुम्ही माझ्या वकिलाची फी भरणार आहात का? इतरांच्या घटस्फोटाबद्दल लोक नेहमी इतकी चर्चा का करतात? कधी ते जयला नावं ठेवतात, तर कधी मला त्यांना सतत कोणाला तरी दोष द्यायचा असतो.” असं म्हटलेलं. परंतु,अद्याप जय व माही यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
