छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मालिकांमध्ये अनेक महिने एकत्र काम केल्यावर ऑनस्क्रीन काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांमध्ये एक खास बॉण्डिंग तयार होतं. ही मानलेली नाती पुढे आयुष्याभर जपली जातात. काही दिवसांपूर्वी अशा एका ऑनस्क्रीन मायलेकीची जोडी चर्चेत आली होती.

स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेतून अभिनेत्री काजल पाटील घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने काही दिवसांआधी अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबरोबर खास फोटो शेअर करून यावर #motherhood #likemotherlikedaughter असे हॅशटॅग्ज दिले होते. यामुळे अनेकांचा काजल ही किशोरी अंबिये यांची खऱ्या आयुष्यात लेक आहे असा गैरसमज झाला होता. यावर अभिनेत्रीने अखेर ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : महिपतला अटक, तर प्रताप मागणार अर्जुनची माफी! मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

काजलने फोटोच्या कॅप्शनमध्ये किशोरी अंबिये यांना आई म्हटल्यामुळे अभिनेत्री त्यांची लेक असल्याचा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. याबाबत अभिनेत्री सांगते, “मी आणि किशोरी अंबिये यांनी ‘कुलस्वामिनी’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. यामध्ये त्या माझ्या ऑनस्क्रीन आई होत्या…खरंतर किशूताई ही माझी आईच आहे. मी मूळची पुण्याची आहे त्यामुळे मुंबईत मी एकटी राहायचे. त्यांनी सेटवर माझ्यासाठी जेवण आणलंय. या क्षेत्रातील अनेक गोष्टी मला किशोरी मम्माने शिकवल्या आहेत. त्यामुळे माझी खरी आई अर्चना पाटील आहे पण, इंडस्ट्रीमध्ये किशू मम्मा माझी आई आहे.”

हेही वाचा : तितीक्षा तावडे, पूजा सावंत पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्यातील पहिला फोटो आला समोर

“किशोरी मम्मा सेटवर नेहमी वेळेत हजर राहते. त्यामुळे सगळे तिला अमिताभ बच्चन म्हणतात. आपण कितीही मोठे झालो तरीही आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. हे संस्कार मला तिच्याकडून मिळाले आहेत.” असं काजलने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काजल सध्या स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत मानसी हे पात्र साकारत आहे. तसेच किशोरी अंबिये देखील याच वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत कलाच्या आईची भूमिका साकारत आहेत. काजलने दिलेल्या या प्रतिक्रियामुळे चाहत्यांमधील संभ्रम आता दूर झाला आहे.