Amruta Bane and Shubhankar Ekbote : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून शुभंकर एकबोटेला ओळखलं जातं. शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकरने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमात देखील झळकला होता. या सिनेमात त्याने साकारलेल्या भूमिकेचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने खास पोस्ट शेअर केली आहे.
गेल्यावर्षी एप्रिल ( २०२४ ) महिन्यात शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचा विवाहसोहळा पार पडला होता. ‘धर्मवीर’, ‘चौक’ या चित्रपटात झळकल्यानंतर शुभंकर ‘सन मराठी’ वाहिनीवर ‘कन्यादान’ मालिकेत काम करत होता. याच मालिकेत शुभंकरची ओळख अमृताशी झाली. ‘कन्यादान’ मालिकेत दोघं ऑनस्क्रीन नवरा-बायकोची भूमिका साकारत होते. मालिका संपताना या दोघांनी २१ एप्रिल २०२४ रोजी लग्नगाठ बांधली.
आज अमृता बनेने पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. अमृता जेव्हा शुभंकरला, “आपल्याकडे बक्कळ पैसे आल्यानंतर काय करूया रे?” असा प्रश्न विचारते तेव्हा शुभंकर तिला सिनेमा बनवूया असं उत्तर देतो. पतीचं हे उत्तर ऐकून अमृता कायम भारावून जाते. याचसंदर्भात तिने बर्थडे पोस्ट शेअर केली आहे.
याशिवाय शुभंकरच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास सिनेविश्वाच्या थीमशी संबंधित असलेला केक ऑर्डर केला होता. यावर ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा ड्रामेबाज’ असं लिहिण्यात आलं होतं.

अमृता बनेची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
आपल्याकडे बक्कळ पैसे आल्यानंतर काय करूया रे? असा प्रश्न विचारल्यावर इतर कोणत्याही मटेरियलिस्टिक गोष्टींचं फॅसिनेशिन न ठेवता…प्लीज आपण एक आणि खूप सारे भव्यदिव्य (आशयधन महत्वाचे) सिनेमे बनवूयात अमृता…असं उत्तर देणारा माझा सिनेमा लव्हर! अह्हं….तुझा हा सच्चेपणा, निरागसता, तुझी रंगभूमी आणि सिनेमासाठीची जाण आणि कळकळ या आणि येणाऱ्या अनेक वाढदिवसागणिक वाढत जाओ…तू या जगातील सगळ्या चांगल्या गोष्टी डिझर्व्ह करतोस हे कायम लक्षात ठेव. Thank You For All The Entertainment! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
दरम्यान, बायकोच्या पोस्टवर “थँक्यू पार्टनर…लवकरच आपल्या सिनेमा आणि नाटकाबद्दल असलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळी स्वप्न पूर्ण होऊदेत हीच स्वामींचरणी प्रार्थना” अशी कमेंट करत शुभंकरने आभार मानले आहेत.