KBC Show Treesha Thosar Question : टीव्हीवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे, ‘कौन बनेगा करोडपती.’ गेल्या २५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मनोरंजनाबरोबरच हा शो अनेक प्रेक्षकांच्या ज्ञानातही भर घालतो. या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धकही त्यांची काही स्वप्ने घेऊन येतात आणि या मंचावरून त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास करतात. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विविध क्षेत्रांतील प्रश्न विचारण्यात येतात.

कला, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन आणि राजकारणाविषयीच्या प्रश्नांसह ऐतिहासिक व पौराणिक अशा विविध क्षेत्रांतील प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्पर्धक आपला करोडपती बनण्याचा प्रवास या करतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर बसण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या शोमध्ये आजवर अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या प्रश्नावलीत मराठी कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक दिग्गज व्यक्तींची नावे आली आहेत. मराठी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज लोकांसंबंधित प्रश्न या शोमध्ये विचारण्यात आले आहेत. अशातच आता ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या यादीत मराठमोळी त्रिशा ठोसरचं नावही सामील झालं आहे. अवघ्या सहा वर्षांच्या त्रिशासंबंधित एक प्रश्न या शोमध्ये विचारण्यात आला.

‘कौन बनेगा करोडपती’च्या शोमध्ये रचित उप्पल हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांना २५ लाख रुपयांसाठी त्रिशा ठोसरसंबंधित प्रश्न विचारण्यात आला आणि हा प्रश्न असा होता की, ‘२०२५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनली?’ पुढे या प्रश्नाचे उत्तर त्यांना देण्यात आले, जे असे होते की, A-त्रिशा ठोसर, B-हर्षाली मल्होत्रा, C-सारा अर्जुन आणि D-झायरा वसीम. रचित उप्पल यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत नसल्यानं त्यांनी लाईफलाइनचा वापर केला.

त्रिशासंबंधित हा प्रश्न सोडवण्यासाठी रचित यांनी ‘प्रेक्षक पोल’ (Audience Poll) या लाईफलाईनचा वापर केला आणि सर्वांनी त्यांना ‘A – त्रिशा ठोसर’ हे योग्य उत्तर दिलं. या उत्तरानं रचित उप्पल २५ लाख रुपये जिंकले. SET India च्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसंच त्रिशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारेही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

KBC शोमध्ये विचारला गेला त्रिशा ठोसरसंबंधित प्रश्न

दरम्यान, त्रिशाला ‘नाळ २’साठी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारानंतर तिच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. त्रिशा लवकरच ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर यांच्याबरोबर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच त्रिशासह या सिनेमात भार्गव जगतापनंदेखील काम केलं आहे