दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सना शिंदे आणि अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. अशातच केदार शिंदे यांची एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.

केदार शिंदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनेकदा ते त्यांची मित्र मंडळी, त्यांचे कुटुंबीय यांच्याबद्दल पोस्ट लिहीत त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. केदार शिंदे यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यांच्या मित्रांबरोबर त्यांचं खूप छान बॉण्डिंग आहे. आता अशाच त्यांच्या एका खास मित्रासाठी त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांचा हा मित्र म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अरुण कदम.

आणखी वाचा : “मला तो प्रचंड आवडतो आणि…,” क्रशचं नाव सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने व्यक्त केली मनातली इच्छा

केदार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अरुण कदम यांच्याबरोबर काढलेला एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी, म्हणजे सर्वांचा लाडका दादुस अरुणविषयी, लिहायचं होतं. पण जमलंच नाही. ‘महाराष्ट्र शाहीर’च्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गेलो होतो. त्या वेळचा हा खास फोटो. अरुण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखांत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरुणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरुणच.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळणारा प्रतिसाद पाहून केदार शिंदेंनी प्रेक्षकांना दिली ‘ही’ खास भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी लिहिलं, “कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढले आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खूप मोठा, पण त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण-गवळण, बतावणी आम्ही दोघं ‘लोकधारा’मध्ये सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण आविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच ऊर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खूप शुभेच्छा अरुण.” आता त्यांची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून यावर त्यांचे चाहते या दोघांचं कौतुक करत आहेत.