अभिनेत्री खुशबू तावडेने ऑक्टोबर महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. खुशबूचं हे दुसरं बाळ असून खुशबू तावडे व संग्राम साळवी यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन गोड मुलं आहेत. तर खूशबुने तिच्या लेकीचं नाव राधी असं ठेवलं आहे. आई झाल्यानंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. या काळात ती तिच्या दोन्ही मुलांचं संगोपन करत आहे.

अशातच अभिनेत्रीने नुकतीच ‘मदर्स डे’निमित्त ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने मातृत्वाबद्दल सांगितलं आहे. खुशबूला या मुलाखतीमध्ये “तुझ्या पहिल्या बाळाच्या प्रसूतीच्या वेळी तुझा अनुभव कसा होता” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने “माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. परंतु, राघवच्या वेळी मला जवळपास दहा तास लेबर पेन झालं. पहिल्यांदाच बाळाला जन्म देत असल्याने माझ्यासाठी सर्वकाही नवीन होतं. मला वाटलेलं की, आता मला लेबर पेन होत आहे तर आता लवकरच बाळ होणार आहे, पण तसं काहीच झालं नाही. पुढचा बराच काळ मला हा त्रास सहन करावा लागला.”

“प्रसूतीदरम्यान जेव्हा मला प्रचंड वेदना होत होत्या तेव्हा मी स्वामींची गाणी ऐकत होते, जेणेकरून मला बरं वाटेल आणि जेव्हा प्रसूतीनंतर मी राघवला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझा सगळा थकवा निघून गेला.” पुढे खुशबू म्हणाली, “याउलट मला दुसऱ्या बाळंतपणाच्यावेळी इतका त्रास झाला नाही. पण, आता दोन्ही मुलांचं संगोपन करताना असं वाटतं की आपण आपलं ह्रदय काढून बाहेर ठेवलंय आणि त्याला खेळताना, बागडताना, धडपडताना आपण बघतोय.”

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुशबूने याबाबत “स्त्रियांना सुशिक्षित केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी नीट पोहचवणं महत्त्वाचं असल्याचं” म्हटलं आहे. पुढे ती म्हणाली, “मी असं खूप ऐकलं होतं की, आई झाल्यावर कळेल वगैरे, पण खरंच काही गोष्टी या आई झाल्यानंतरच कळतात.”

दरम्यान, खुशबू यापूर्वी ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत काम करीत होती. महत्त्वाचं म्हणजे ती आठ महिन्यांची गरोदर असतानाही या मालिकेत काम करत होती. यापूर्वी खुशबूने ‘अशा आम्ही दोघी’, ‘देवयानी’, ‘मेरे साई’, ‘तेरे बीन’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांसारख्या अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.