Kiran Mane Daughter : मराठी कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींची मुलं सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी देखील त्यांच्या लेकीची मनोरंजनसृष्टीत एन्ट्री झाल्याची आनंदाची बातमी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या मुलीचं नाव आहे ईशा. तिच्या पहिल्या वहिल्या प्रोजेक्टबद्दल सांगताना किरण माने यांनी खास पोस्ट शेअर करत लेकीचं कौतुक केलं आहे.
अभिनेते किरण माने त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे त्यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी बऱ्याच मराठी मालिका अन् सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकीने सुद्धा मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आहे.
किरण मानेंची मुलगी रघुवीर यादव दिग्दर्शित ‘मारे गये गुलफाम’ या नाटकात काम करत आहे. याशिवाय स्मिता भारती दिग्दर्शित ‘टेढी लकीर’ या नाटकात सुद्धा ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याबद्दल किरण मानेंनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
किरण माने लिहितात, “आपलं लेकरू भारतीय रंगभूमीवर उभं राहतंय… ते सुद्धा रघुवीर यादव यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर! यासारखं दुसरं सुख नाही. रघुवीर यादव दिग्दर्शित आणि अभिनीत ‘मारे गये गुलफाम’ नाटकात माझी मुलगी ईशा काम करतेय. परवा या नाटकाचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशात भोपाळ येथे झाला. प्रयोगाच्या आधी रघुवीरजींबरोबर चर्चा करताना तिचा फोटो पाहिला आणि मन भरून आलं! …ईशाची प्रमुख भुमिका असलेल्या ‘टेढी लकीर’ या स्मिता भारती दिग्दर्शित नाटकाचे प्रयोगसुद्धा मुंबईत सुरू आहेत. पार्थ झुत्शी यांसारख्या हिंदी नाटक सिनेमातल्या गुणी अभिनेत्याबरोबर तिनं तगडी भूमिका साकारली आहे. ईशाचा उत्तम गायिका असण्याचा या दोन्ही नाटकांत खूप सुंदर उपयोग करून घेतला आहे. स्वबळावर संघर्ष करत तिनं ही सुरुवात केली याचा खूप अभिमान आहे. अभी से छोटी हुई जा रही हैं दीवारें…अभी तो बेटी ज़रा सी मेरी बड़ी हुई है!”
दरम्यान, किरण मानेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच ईशाला तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
