सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सध्या चर्चेत आहे. शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसत आहेत. कधी कामामुळे घरात स्पर्धकांमध्ये वाद होतात तर कधी एखाद्यावर टिप्पणी केल्यामुळे होतात. काही वेळा भांडणानंतर स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलून भावनिक होतात. ज्येष्ठ सिने अभिनेत्री कुनिका सदानंदने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींबद्दल खुलासा केला. तिने लिव्ह-इन पार्टनरकडून झालेल्या विश्वासघाताबद्दल सांगितलं.

कुनिका सदानंद आणि स्पर्धक नीलम गिरी यांची चांगली मैत्री आहे. नुकत्याच त्या दोघी एकमेकींशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसल्या. कुनिकाने नीलमला तिच्या नात्याबद्दल विचारल्यावर त्यांच्यातील संभाषण सुरू झाले. नीलमने तिचं नातं जवळपास संपलंय, असं सांगितलं. तर, कुनिका म्हणाली की तिने तिचं नातं २७ वर्षे लपवून ठेवलं होतं.

कुनिका सदानंदने सांगितलं की तिने २७ वर्षे तिचं नातं लपवून ठेवलं होतं. पण आता अखेर ती याबद्दल बोलली आणि आता तिला हलकं वाटत आहे. यावर तान्याने लगेच विचारलं की हे नातं लग्न होतं का? कुनिका म्हणाली की ते लग्न नाही तर लिव्ह-इन रिलेशनशिप होतं. अभिनेत्रीने तिच्या लिव्ह-इन पार्टनरबद्दलही सांगितलं. तो आधीच विवाहित होता. पण, तो त्याच्या पत्नीपासून दूर राहत होता. नंतर तो दुसऱ्या कुणाला तरी भेटला आणि त्याचे अफेअर सुरू झाले. अशा रितीने त्याने कुनिकाची फसवणूक केली. तो फसवणूक करतोय हे लक्षात आल्यावर कुनिकाने त्याच्याशी नातं संपवलं.

कुमार सानू व कुनिका सदानंद यांचं अफेअर

कुनिकाने एका मुलाखतीत बॉलीवूड गायक कुमार सानूबरोबरच्या अफेअरबद्दल सांगितलं. कुमार सानू व कुनिका एकमेकांशी पती-पत्नीसारखे वागायचे. त्यांची पहिली भेट उटी येथे झाली, तिथे कुनिका एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होती आणि कुमार सानू त्यांच्या बहिणी आणि मुलांबरोबर फिरायला आले होते.

कुमार सानूच्या कुटुंबाचा आदर म्हणून कुनिकाने हे नातं लपवून ठेवलं होतं. दोघे फक्त स्टेज शोमध्ये एकत्र दिसायचे. कुनिका कुमार सानूने कोणते कपडे घालायचे, ते ठरवायची. पण नंतर कुमार सानूच्या पहिल्या पत्नीला दोघांच्या नात्याबद्दल समजलं. रीता भट्टाचार्यने कुनिकावर हल्ला केला होता. कुनिका म्हणाली, “रीताने माझ्या गाडीवर हॉकी स्टिकने हल्ला केला आणि माझ्या घराबाहेर गोंधळ घातला. तिला कुमार सानूकडून तिच्या मुलांसाठी पैसे हवे होते, जे चुकीचं नव्हतं.” या सगळ्या प्रसंगांनंतर कुमार सानू व कुनिकाचं नातं तुटलं. “मी त्यांना माझा पती मानत असे आणि त्यांना साथ देत होते,” असं कुनिका म्हणाली होती.