मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कुशलने अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर कुशल आता हिंदी कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचं नाव ‘मॅडनेस मचाएंगे’ असून हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर प्रसारित करण्यात येत आहे.

‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात कुशलने नुकताच त्याच्या पहिल्या चित्रपटाचा किस्सा सांगितला. आता अभिनेत्याचा पहिला चित्रपट नेमका कोणता होता जाणून घेऊयात…कुशलने सांगितलेला हा प्रसंग ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले होते.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंच्या पत्नीला पाहिलंत का? वाढदिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले, “तुझ्याविना माझं सतत…”

कुशल म्हणाला, “माझा पहिला चित्रपट होता जत्रा. २००५ मध्ये हा चित्रपट आला. ज्यावेळी पेमेंटच्या गोष्टी ठरल्या तेव्हा मी ऑफिसमध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मला तेव्हा दर दिवशीचं मानधन वगैरे अशा कोणत्याच गोष्टी माहिती नव्हत्या. माझं एकूण ३० दिवसांचं काम होतं आणि मोठी भूमिका होती. ऑफिसमध्ये मी गेलो तेव्हा ते म्हणाले ३ हजार रुपये मिळतील. मी लगेच गणित गेलं म्हटलं ९० हजार रुपये मिळणार बापरे! मग मी पेपर साइन केले…मग समजलं अरे हे पूर्ण पॅकेज आहे. म्हणजेच ३० दिवसांचे ३ हजार रुपये मला मिळणार होते. माझा मित्र म्हणाला, तुझा हा पहिला चित्रपट आहे लोक काम करायला पैसे देतात…इथे तुला पैसे मिळत आहेत. ३० दिवसांचं काम आहे…मोठी भूमिका आहे म्हणून मी लगेच तयार झालो.”

“चित्रपटाचं एक शेड्यूल पूर्ण झालं आणि माझे बाबा गेले. बाबा गेल्यावर मी केस काढू शकलो नाही कारण, दुसरं शेड्यूल चालू होणार होतं. चित्रपट प्रदर्शित झाला…माझी आई माझ्या मागच्या सीटवर बसलेली माझं नाव चित्रपटात झळकलं… मी मध्यांतराला मागे पाहिलं तेव्हा माझी आई माझ्या वडिलांचा फोटो घेऊन तो चित्रपट पाहत होती. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्या चित्रपटात आम्ही जेवढे कलाकार होतो आम्ही सगळे आज मराठी कलाविश्वात लोकप्रिय आहोत. त्या एका चित्रपटाने आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आजही त्या (जत्रा) चित्रपटाचा सीक्वेल यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे.” हा भावुक प्रसंग सांगताना कुशल बद्रिकेला अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा : Video : “माझी आई पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याची खास पोस्ट; म्हणाला…

कुशलने हा प्रसंग सांगतानाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “ही गोष्ट मी कधीच कुठे शेअर केली नव्हती; म्हणजे तसं काही जुळूनच आलं नाही कधी. आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. नाही का ? पहिलं प्रेम, पहीली नोकरी, पहिली गाडी, पहिलं घर…तसंच ही माझी ‘पहिली फिल्म’ जत्रा!केदार सर तुम्ही संधी दिलीत आणि आयुष्याचं सोनं झालं. (आता सोनी झाली असं म्हणायला हरकत नाही.) भरत दादा तुम्ही कायम संभाळून घेतलंत .बाकी मोन्या, सिध्दू, संज्या, रम्या, गण्या ह्यांना सांगू नका हां, माझं नाव कुश्या आहे ते.” असं कुशलने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या भावुक पोस्टवर सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, सुयश टिळक या कलाकारांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत व कुशलला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.