महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदवीरांमध्ये अभिनेता कुशल बद्रिकेचं नाव आघाडीवर आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली १० वर्षे तो ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. चित्रपट, नाटक अशा सगळ्या माध्यमांमध्ये कुशलने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने झी मराठी वाहिनीसाठी खास पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत कुशलने त्याच्या सगळ्या चाहत्यांना वाचून दाखवलं आहे.

कुशल म्हणतो, “प्रिय झी मराठी, तशी आपली मैत्री ‘हसा चकटफू’पासूनची पण, ती सर्वार्थाने फुलली या १० वर्षांत. लहानपणी आभाळात उडणारं विमान पाहिलं की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेन. पण, आता कधी या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही हा विमान प्रवास घडवलात.”

हेही वाचा : कौशल कुटुंबाची लाडकी सून कतरिना कैफ सासू-सासऱ्यांबद्दल म्हणाली, “त्यांनी विकी आणि सनीला…”

कुशल पुढे सांगतो, “आमच्या सगळ्यांची आमच्या डोळ्यासमोर एकाची दोन घरं आणि घरासमोर दोनाची चार चाकं झाली. नंतर त्याच घरात दोनाचे चार हात झाले. मग काहींनी त्या चाराचे सहा हात केले. तर काहींनी अगदी बारा-बारा हात केले. पण, त्यात तुमचा काही हात नाही त्यामुळे तो विषय सोडा…तुमच्यामुळे आईच्या डोळ्यात बऱ्याचदा अभिमानाने पाणी दाटून आलं. त्याची किंमत मोजता न येणारी आहे. आईच्या पापण्यांच्या शिपल्यांत नंतर त्या पाण्याचे मोती झाले. नंतर मात्र, त्याची किंमत डॉक्टरांकडे मोजावी लागली. पण, ते जाऊद्या…”

हेही वाचा : लग्नानंतर प्रथमेश परबने जोडीने केली सत्यनारायण महापूजा! क्षितिजाने सासरी ‘असा’ केला गृहप्रवेश, पाहा फोटो

“कामाचं प्रेशर आणि लोकांच्या प्रेमाचा गोडवा…दोन्ही गोष्टी रक्तात उतरल्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगर यांच्याशी आता रक्ताचं नातं जोडलं गेलं आहे. या कार्यक्रमाने जसं जग फिरवलं तसं आपल्या आजूबाजूचं जग ओळखायला देखील शिकवलं. कोणाचा का कोंबडा आरवेना…दिवस उगवल्याशी मतलब असणारी मतलबी माणसं…आणि आपल्याच आरवण्याने दिवस उगवला म्हणणारे कोंबडे सुद्धा पाहिले.”

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उगवत्या सुर्याला सलाम ठोकणाऱ्यांच्या दुनियेत रात्रीच्या अंधारात ऊब देणाऱ्या घराची किंमत कळली. आणि एक गोष्ट कळली ती म्हणजे, पेरलेलं आनंदाचं बीज हे एखाद्या वटवृक्षासारखं असतं. त्याच्या पारंब्यांमधून सुद्धा आनंदाच झाड उगवतं. फक्त जमीन झुकता कामा नये एवढी मात्र काळजी आपण घ्यायला हवी. थँक्यू झी मराठी!” असं भावुक पत्र कुशलने लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याने शेअर केलेल्या या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय त्याच्या चाहत्यांनी कुशलला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.