Bill Gates In Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका. या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिकली आहेत. मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तसाच प्रतिसाद आता ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’लासुद्धा मिळत आहे. मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत टॉप ५ मध्ये आहे.

अशातच आता या मालिकेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे, ती म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’मध्ये उद्योगपती बिल गेट्स यांची एन्ट्री होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे या मालिकेत लवकरच झळकणार आहेत. ते सेटवर प्रत्यक्षात येणार नसून, व्हर्च्युअली (व्हिडीओ कॉल)द्वारे सहभागी होणार आहेत.

मालिकेच्या आगामी भागांमध्ये स्मृती इराणी (तुलसी) आणि बिल गेट्स यांच्यात व्हिडीओ कॉलद्वारे संवाद होणार आहे. हा ट्रॅक तीन भागांमध्ये दाखवला जाणार आहे. सध्या प्रसारित झालेल्या भागात तुलसीला तिच्या स्वयंपाकि‍णीच्या डोहाळजेवणाचे निमंत्रण मिळतं. इथून पुढे मालिकेत बिल गेट्स यांचा ट्रॅक सुरू होणार आहे.

बिल गेट्स यांचा हा एपिसोड फक्त मनोरंजनासाठी नाही, तर आरोग्य जागरूकतेचा संदेश देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. २४ आणि २५ ऑक्टोबरला दोन भागांत प्रसारित होणाऱ्या या एपिसोडमध्ये बिल गेट्स व्हिडीओ कॉलद्वारे दिसतील. या विशेष भागामध्ये गर्भवती महिलांचे आरोग्य, नवजात बाळांची काळजी आणि मातृत्वाच्या सन्मानाचा संदेश दिला जाणार आहे.

स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांचा एकत्र फोटो

स्मृती इराणींनी यापूर्वीही मालिकेतून शारीरिक सौंदर्याची सकारात्मकता, पिढ्यांमधील अंतर आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांना स्पर्श केला आहे, त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात बिल गेट्स हे मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि गर्भवती महिलांचे व नवजात बालकांचे आरोग्य या विषयावर तुलसीबरोबर चर्चा करणार आहेत. मालिकेत बिल गेट्स येत असल्यानं ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ला या आठवड्यात जबरदस्त टीआरपी मिळेल, अशी शक्यताही आहे.

दरम्यान, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मालिका Jio Cinema व Disney+Hotstar वर प्रसारित केली जाते आणि Star Plus वाहिनीवर दररोज रात्री १०:३० वाजता प्रसारित होते. सध्याचा सीझन मर्यादित भागांचा म्हणजेच १६५ ते १७० भागांचा असणार आहे.