Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 First Promo : येत्या काळात अनेक नवनवीन चित्रपट, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत मात्र, काहीही झालं तरी भारतात टेलिव्हिजनची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. अनेक कलाकार इंडस्ट्रीतील करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून करतात. छोट्या पडद्यावरची कोणती मालिका तुम्हाला कायम लक्षात राहील असा प्रश्न विचारला तर मराठीत ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’ या मालिकांची नावं घेतली जातात. तर, हिंदीत सर्वात आधी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा उल्लेख प्रेक्षकांकडून आवर्जून केला जातो.
निर्माती एकता कपूरने काही दिवसांपूर्वीच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. या मालिकेला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जुलै २००० मध्ये ही मालिका ऑन एअर झाली होती. २००० ते २००८ या काळात ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या मालिकेने अधिराज्य गाजवलं होतं. केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांना याच मालिकेमुळे घराघरांत ओळख मिळाली होती. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
आता तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा ‘तुलसी’ टेलिव्हिजनवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेत्री स्मृती इराणी मालिकाविश्वात पुन्हा परतणार का याबद्दल चाहत्यांना शंका होती पण, आता नुकताच या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’च्या प्रोमोत पाहायला मिळतंय की, हॉटेलमध्ये एक कुटुंब या मालिकेबद्दल चर्चा करत असतं. यावेळी तुलसीच्या भूमिकेत स्मृती इराणी परतणार का यावर विशेष चर्चा होत असते आणि मग एन्ट्री होते तुलसीची ( स्मृती इराणी ) प्रेक्षकांशी गेल्या २५ वर्षांपासून घट्ट नातं आहे त्यामुळे मी पुन्हा आलेय…असं अभिनेत्री या व्हिडीओमध्ये सांगतात.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ ही मालिका २९ जुलैपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. याशिवाय जिओ हॉटस्टारवर देखील तुम्ही ही मालिका पाहू शकता.
दरम्यान, अनेकांनी या प्रोमोच्या कमेंट्समध्ये ही मालिका रात्री उशिराचा स्लॉट डिझर्व्ह करत नाही निदान ८ किंवा ८:३० चा प्राइम स्लॉट दिला पाहिजे असंही म्हटलं आहे. पण, मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता याचा पहिलाच एपिसोड रेकॉर्डब्रेक टीआरपी आणेल असंही म्हटलं जात आहे. नेटकऱ्यांसह हिंदी कलाविश्वातील कलाकारांनी देखील ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’च्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत स्मृती इराणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.