Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Cast Reunited For Upcoming Season : ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’चं दुसरं पर्व लवकरच सुरू होणार आहे. त्यानिमित्तानं मालिकेच्या पहिल्या पर्वातील सर्व कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’मधील तुलसी व मिहिर ही जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. आता ही जोडी लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी मालिकेचं दुसरं पर्व सुरू होणार आहे. त्यानिमित्त यातील पहिल्या पर्वातील कलाकार मंडळी चित्रीकरणासाठी एकत्र आल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं.

‘स्टार प्लस’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या संदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी व्हिडीओमध्ये मालिकेतील सर्व जुने कलाकार पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओला ‘कॅमेऱ्यामागे लपलीये मैत्री आणि खूप साऱ्या आठवणी. तुलसीबरोबर पुन्हा प्रवास सुरू होत आहे. तुम्ही सोबत येणार का?’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेता शक्ती आनंद, रितू सेठ, गौरी प्रधान, हितेन तेजवाणी, अमर उपाध्याय, कमालिका गुहा ठाकुरता, केतकी दवे आणि इतर काही कलाकार मंडळी चित्रीकरण करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे शक्ती आनंद यानं तो पुन्हा एकदा या सर्व कलाकारांसह चित्रीकरण करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. या मालिकेतूनच त्यानं पदार्पण केलं होतं.

व्हिडीओमध्ये पुढे कमलिका मालिकेच्या आठवणी सांगताना दिसल्या. त्या म्हणाल्या, “मी आठ वर्षं या मालिकेत भूमिका साकारली होती. आता मालिकेला प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे या मालिकेच्या सेटवर पुन्हा परतल्यानं मागच्या अनेक आठवणी ताज्य झाल्या”. कमालिका यांनी त्यामध्ये गायत्री जमनादास विराणी ही भूमिका साकारली होती.

‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ मालिकेतून तुलसी व मिहिर यांना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचे दिसते. अभिनेत्री व राजकारणी स्मृती इराणी यांच्यासह अमर उपाध्याय यामधून प्रमुख भूमिकेतून झळकला होता. ३ जुलै २००० रोजी ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ मालिका प्रदर्शित झाली होती. २००८ साली या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. २९ जुलै रोजी या मालिकेचं दुसरं पर्व सुरू होणार आहे. त्यामधून बऱ्याच वर्षांनंतर स्मृती इराणी टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहेत.