Lagna Nantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत लवकरच पार्थ आणि काव्या त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना पुन्हा एकदा काव्या आणि वसु आत्यांमध्ये वाद होणार आहे.

काव्या आणि नंदिनी या दोघी बहिणी देशमुखांच्या घरात लग्न करून आल्यात ही गोष्ट वसु आत्याला पहिल्या दिवसापासून खटकत असते. वसु आत्या नेहमी काही ना काही कुरघोड्या करून काव्या-नंदिनीचा अपमान करत असतात. नंदिनीचा स्वभाव शांत असल्याने ती सहसा वसु आत्याला उलट उत्तर देत नाही. मात्र, काव्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाची असते. ती जिथल्या तिथे वसु आत्याला उलट उत्तरं देत असते.

आता पुन्हा एकदा मंथ अ‍ॅनिव्हर्सरीचा केक कापताना काव्या आणि वसु आत्यांमध्ये मोठा वाद होणार आहे. याचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकताच शेअर करण्यात आला आहे. काव्या आणि पार्थ एकत्र केक कापतात. यानंतर काव्या केकचा पीस कापून पार्थला भरवण्यासाठी हात पुढे करते आणि क्षणभर विचारात पडते. यावेळी वसु आत्या म्हणते, “अगं बघत काय बसलीयेस…लवकर केक भरव पार्थला आम्हाला सुद्धा केक खायचाय.”

वसु आत्याच्या सतत खोचक बोलण्याला कंटाळलेली काव्या मागे फिरते आणि तोच केक वसु आत्याच्या तोंडात रागाने कोंबते. काव्याचा राग पाहून सगळेच शांत होतात. एवढ्यात नंदिनी म्हणते, “काव्या आताच्या आता पार्थ आणि वसु आत्यांची माफी माग…” पण, आता काव्या बहिणीचंही ऐकत नाही ती पटकन म्हणते, “पार्थ माझा नवरा आहे आणि त्यांची माफी मागायची की नाही मागायची… ते आमचं आम्ही बघून घेऊ!”

काव्याचं हे अनपेक्षित उत्तर ऐकून पार्थच्या चेहऱ्यावर हसु उमटतं. नंदिनीही आनंदी होते, तर मागे उभा असलेला जीवा काव्याचं हे उत्तर ऐकून शॉक होतो. काव्याचा हा वेगळाच अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरणार आहे. हा विशेष भाग १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित केला जाणार आहे.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकरी प्रचंड आनंदी झाले आहेत. “Finally काव्याने कबूल केलं”, “ब्राओ गर्ल”, “हो काव्या तुझाच नवरा आहे पार्थ”, “किती मस्त प्रोमो आहे”, “काव्या रॉक्स जीवा शॉक”, “नंदिनी आणि पार्थची स्माइल एक नंबर आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.