Vivek Sangle New Home : विवेक सांगळे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक वर्ष काम केल्यानंतर अभिनेत्याने मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. अशातच आता त्याने त्याच्या घराची झलक दाखवली आहे.

विवेक सांगळेने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याच्या नवीन घराची झलक दाखवत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केलेली. त्यानंतर अभिनेत्याने त्याच्या नवीन घरात गणेश चतुर्थीदेखील साजरी केली. अशातच आता त्याने त्याच्या या नवीन घराची संपूर्ण झलक दाखवली आहे. यावेळी त्याने त्याचं घर वास्तुशास्त्रानुसार सजवल्याचं म्हटलं आहे.

विवेकने ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत काम करत असतानाच लालबाग येथे नवीन घर खरेदी केल्याचं एका मुलाखतीतून म्हटलेलं; तर काही दिवसांपूर्वीच त्याच्या नवीन घराचं संपूर्ण काम पूर्ण झालं असून आता अखेर त्याच्या घराची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. विवेक सांगळेच्या घराची झलक Elements 5 Designe Studio या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहे. तसेच त्याने याचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केला आहे.

“माझा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे” – विवेक सांगळे

विवेक त्याच्या घराच्या रंगाबद्दल थोडा शाशंक होता, पण काम पूर्ण झाल्यानंतर त्याला तो रंग आणि डिझाइन खूप आवडल्याचं त्याने म्हटलं आहे. यासह त्याने त्याच्या घराची सजावट वास्तुशास्त्रानुसार केल्याचं म्हटलं आहे. विवेकच्या घरातील दाराला भगवा रंग दिला असून दार उघडताच त्याच्या घरात विठोबा-रखुमाईची मूर्ती पाहायला मिळते. याबद्दल तो म्हणाला, “मला एक गाय आणि तिचं छोट वासरू असं चित्र हवं होतं, याचं कारण की आमच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या सेटवर असंच एक पेंटिग आहे आणि ते पाहून मी ठरवलेलं की घराचं काम सुरू होईल तेव्हा असं एक पेंटिंग शोधणार. पण, ते कुठे ठेवायचं याचा मी विचार करत होतो, तेव्हा ही पूर्व दिशा आहे आणि माझा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे. या सगळ्या गोष्टी मी मानतो, म्हणून ही पेंटिंग इथे ठेवली.”

विवेक सांगळे पुढे म्हणाला, “वास्तुशांतीच्या दिवशी माझे जवळचे मित्र आहेत ते विठोबा रखुमाईची मूर्ती घेऊन आले आणि आता ही माझी घरातील आवडती जागा आहे.” त्यानंतर त्याने त्याच्या घरातील हॉलची झलक दाखवली. याबद्दल विवेक म्हणाला, “हॉलचा हा लूक पाहून मी आणि माझ्या घरचे आम्ही सगळे चकित झालो होता. इतकं छान त्याचं इंटिरियर केलं आहे. मी विचार केलेला त्याहीपेक्षा खूप सुंदर लूक झाला आहे.”

लालबागमध्ये घर घेण्याचं स्वप्न

लालबागमध्येच घर घेण्याबद्दल विवेक म्हणाला, “मी लालबागमध्ये लहानचा मोठा झालो आहे, त्यामुळे माझं स्वप्न होतं की इथेच घर खरेदी करायचं. पण, माझ्या बजेटनुसार इथे वन बीएचकेच येणार होता. त्याच्यापुढे काही जाणारं नव्हतं. पण, तो जर वन बीएचके फार मोठा नसेल तर मग तो फ्लॅट मोठा दिसावा याकरिता कशी डिझाईन करता येइल याचा विचार केला.” विवेकने पुढे त्याच्या घरात त्याला एक बार कॉर्नर हवा होता याबद्दल सांगितलं आहे. विवेक म्हणाला, “हा खूप महत्त्वाचा कोपरा आहे माझ्यासाठी. मला इथे बार काउंटर हवं होतं, पण त्याचबरोबर स्टोरेज राहील असंही काहीतरी हवं होतं. त्यातल्या त्यात मग त्यांनी मला अशी डिझाईन करून दिली. सध्या इथे काही ठेवलं नाहीये, पण पुढे माझ्या आवडीच्या ब्रँडच्या बॉटल इथे ठेवेन.”

बार काउंटर जवळच्या पेंटिंगबद्दल विवेक म्हणाला, “हे वॉल पेंटिंग आहे. मी जसं म्हटलं की माझा वास्तुशास्त्र या सगळ्या गोष्टींवर खूप जास्त विश्वास आहे. माझे जे गुरुजी आहेत, त्यांनी सांगितलं होतं की ही उत्तर दिशा आहे, इथे वॉटर फॉलच्या पेंटिंग असं काही करता आलं तर बघ.” विवेकने यासह त्याच्या बेडरुमचीही झलक दाखवलेली पाहायला मिळते. यावेळी त्याने बेडरुम जरी लहान असलं तरी त्यात स्टोरेजसाठीही जागा होईल आणि इंटिरियरही छान होईल असं काहीतरी करायचं होतं आणि त्याच्या इंटिरियर डिझायनरने त्याला तशीच डिझाईन करून दिल्याचं म्हटलं आहे.