Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत नंदिनी आणि पार्थ या दोघांनी वैतागून जीवा आणि काव्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर जीवा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. पण, परिस्थितीमुळे जीवाचं लग्न नंदिनीशी आणि काव्याचं लग्न पार्थबरोबर होतं. आता या अनपेक्षितपणे झालेल्या लग्नानंतर संसार करणं प्रत्येकाला कठीण वाटतं. मात्र, नंदिनी आणि पार्थ हे दोघंही क्षणोक्षणी जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
नंदिनीने प्रचंड समजूतदारपणा दाखवूनही जीवा कायम तिच्यावर वैतागलेला असतो, तिला प्रत्येक गोष्टीचा दोष देतो. तर, दुसरीकडे काव्या पार्थच्या नकळत वकिलांना फोन करून घटस्फोटाचे पेपर्स बनवून घेते. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. नंदिनी जीवाला म्हणते, “मी तुम्हाला या नात्यातून मुक्त करतेय, आपण घटस्फोट घेऊयात” याशिवाय पार्थ सुद्धा काव्याच्या सुखासाठी घटस्फोट द्यायला तयार होतो.
मात्र, आता मालिकेत जीवा आणि काव्या यांना त्यांच्या चुका लक्षात येणार आहेत. जीवा सध्या नंदिनीचं मन वळवण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसतोय. ‘बायकोसाठी काहीपण’ म्हणत आता चक्क जीवा रिक्षाचालकाचं रुप घेऊन नंदिनीसमोर येणार आहे. नंदिनी रिक्षाचालकाला म्हणते, “आशीर्वाद बंगला येणार का? अगदी देवासारखे भेटलात… इतक्यात रिक्षा चालवणारा जीवा मागे वळून तिला म्हणतो देवा नाही…जीवा म्हणा”
तर दुसरीकडे, पार्थच्या गाडीचा टायर पंक्चर होतो, तो मनात विचार करतो की आता रिक्षाही मिळणार नाही. इतक्यात त्याला एक रिक्षा दिसते आणि त्यात आधीच काव्या बसलेली असते. ती त्याला म्हणते, या – या आपलीच रिक्षा आहे. पुढचा प्रवास पार्थ आणि काव्या एकत्र करतात.
आता नंदिनीचं मन वळवण्यात जीवा यशस्वी होईल का? पार्थ काव्याबरोबरच्या नात्याबाबत काय निर्णय घेणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते.