Mrunal Dusanis Shares Funny Love Letter Story : ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. यानंतर तिने ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मनं बावरे’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. छोट्या पडद्यावरील तिच्या प्रत्येक भूमिका गाजल्या. सध्या मृणाल स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.

मालिकांबरोबरच मृणाल तिच्या लग्नामुळेही चर्चेत आली. मृणालनं अरेंज मॅरेज करत नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. आता त्या दोघांना एक लहान मुलगीही आहे. मृणाल-नीरज यांचं अरेंज-मॅरेज असलं, तरी त्यांची लग्नाची गोष्ट एखाद्या फिल्मी लव्हस्टोरीपेक्षा काही कमी नाही. लग्नाआधी मृणाल-नीरज मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहत असत. याचदरम्यान, ते एकमेकांना चिठ्ठीसुद्धा लिहायचे.

अशातच एकदा मृणालने नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी तिच्या बाबांनी पकडली होती. नुकत्याच एका मुलाखतीत दोघांनी चिठ्ठीचा मजेशीर किस्सा शेअर केला. अनुरूप विवाहसंस्था या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मृणालने नीरजला लिहिलेली चिठ्ठी बाबांनी पकडल्याचा किस्सा सांगितला.

या मुलाखतीत मृणाल-नीरज यांना ‘एकमेकांना कधी पत्र लिहिलं होतं का?’ असं विचारण्यात आलं. याबद्दल नीरज म्हणाला, “पत्र असं नाही… पण आम्ही एकमेकांबद्दल दोन ओळी लिहून, त्याचे फोटो मोबाईलद्वारे पाठवले होते.” यानंतर मृणाल म्हणाली, “आम्हाला एकमेकांचं अक्षरं बघायचं होतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं? हे त्यावर लिहिलं आणि त्याचे फोटो शेअर केले.”

यानंतर मृणालने या चिठ्ठीचा मजेशीर किस्सा शेअर केला. याबद्दल ती म्हणाली, “मी घरात बाबा किंवा भावाचे कपडे घालायचे. मला सवयच आहे ती… तर एकदा मी बाबांचं शर्ट घातलं होतं. तेव्हाच नीरजला चिठ्ठी लिहिली, त्याचा फोटो काढला आणि ती चिठ्ठी त्या शर्टच्या खिशात ठेवली. नंतर कुठेतरी जायचं, म्हणून बाबांनी तो शर्ट घातला; तर त्यांना ती चिठ्ठी मिळाली आणि त्यांनी ती चिठ्ठी वाचली. तेव्हाच बाबांना कळलं की, आम्ही आता प्रेमात पडलो आहोत आणि त्याचदिवशी मी आई-बाबांना नीरजबरोबर लग्न करायला तयार असल्याचं सांगितलं होतं.”

मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, छोटा पडदा गाजवलेल्या मृणालने काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर मृणाल ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिच्यासह विवेक सांगळे, विजय आंदळकर आणि ज्ञानदा रामतीर्थकरसह इतर लोकप्रिय कलाकारही आहेत. रोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते.