Lagnanantar Hoilach Prem: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. काव्या, जीवा, नंदिनी, पार्थ ही पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. या मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.
जीवा नंदिनीचा पत्नी म्हणून स्वीकार करणार?
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जीवा नंदिनीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याकडे एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पोलीस जीवासाठी घरी येतात. पोलिसांना घरी आलेले पाहून घरातील सर्व मंडळी एकत्र येतात. पोलीस म्हणतात, “मिस्टर दीपक यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यांतर्गंत तुम्हाला अटक करायला आलो आहोत.” हे ऐकल्यानंतर सर्वांनाचधक्का बसतो.
जीवा पोलिसांना म्हणतो, “माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होतील”, त्यावर पोलिस त्याला विचारतात की, तुमची बायको कोण आहे? जीवा त्यांना म्हणतो, “नंदिनी जीवा देशमुख.” ते ऐकल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलल्याचे दिसत आहेत; तर वरच्या मजल्यावरून खाली येत असलेल्या नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, ‘नवरा म्हणून जीवा आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याने सुखावणार नंदिनी…’, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जीवाचे कौतुक केले आहे. अनेकांनी हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “मी आशा करतो की, हा नंदिनी व जीवाच्या नात्यातील वळण घेणारा क्षण असावा.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “नंदिनी जीवा देशमुख, हे ऐकायला छान वाटतंय” अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.



मालिकेत दाखविल्याप्रमाणे, नुकतीच दीपकने नंदिनीला जीवे मारण्याची योजना बनविली होती. मात्र, जीवा व पार्थने तिला वेळीच वाचवले. दीपकचे नंदिनीवर प्रेम होते. त्यानेच लग्नात नंदिनीला किडनॅप केले होते. त्याच्यामुळे नंदिनी व पार्थचे लग्न होऊ शकले नाही. नंदिनी व काव्याला गावकऱ्यांच्या दबावामुळे मर्जीविरुद्ध लग्न करावे लागले. तर, नंदिनी व जीवालादेखील परिस्थितीमुळे लग्न करावे लागले. या सगळ्यात काव्या व जीवा एकमेकांवर प्रेम करीत होते.
लग्नानंतर काव्याने अनेकदा दोघांनीही घटस्फोट घ्यावा, असे सुचवले. मात्र, पार्थ व नंदिनीने या लग्नाला संधी द्यावी, असा विचार केला. आता मालिकेत पुढे काय होणार, काव्या पार्थबरोबरच्या आणि जीवा नंदिनीबरोबरच्या लग्नाचा मनापासून स्वीकार कधी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.