Girish Oak & Pallavi Oak Shared Their Lovestory : गिरीश ओक मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता त्यांनी नुकतीच ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात सपत्नीक हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
‘झी मराठी’वरील ‘आम्ही सारे खवय्ये- जोडीचा मामला’ या कार्यक्रमाचा व्हिडीओ वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल, तसेच इतर आवडी-निवडींबद्दल सांगितलं. अशातच आता वाहिनीने शेअर केलेल्या नवीन एपिसोडच्या व्हिडीओमध्ये अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी त्यांच्या पत्नी पल्लवी ओकसह हजेरी लावली. यावेळी अभिनेता व या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेनं त्यांना त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल विचारलं.
गिरीश ओक व पल्लवी ओक यांची ‘अशी’ झालेली पहिली भेट
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये संकर्षणच्या हातात छोटीशी बस असून तो त्यांना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारतो. त्यावर गिरीश ओक म्हणाले, “मी आणि ती एकाच बसमध्ये बसलेलो होतो. पहिली भेट आमची बसमध्ये झाली.” पुढे संकर्षणने “पण त्या बसमध्ये काही संवाद घडला की नेमकं काय घडलं?” असं विचारलं. त्यावर गिरीश यांच्या पत्नी म्हणाल्या, “आम्ही पुणे ते मुंबई प्रवास करीत होतो आणि मी आधीच बसमध्ये बसलेले होते आणि कर्वे रोडला गिरीश आला. मी त्याला पाहिलं तेव्हा म्हटलं की, डॉ. गिरीश ओक बसने वगैरे कसा प्रवास करतायत.”
पल्लवी ओक पुढे म्हणाल्या, “बसमध्ये आमच्या ज्या सीट होत्या, त्यात माझी सीट पुढे आणि त्याच्याच मागे त्याची सीट होती. लोणावळ्याला जेव्हा बस थांबली तेव्हा त्याच्या शेजारी एक, माझ्या शेजारी एक आणि आमच्या सीटच्या त्या बाजूला एका कुटुंबाच्या सीट होत्या, तर मला त्या बसच्या अटेंडंटने विचारलं की, तुम्हाला मागे बसायला आवडेल का, मी म्हटलं मला आवडेल; पण जे तिथे जे बसलेत त्यांना चालणार आहे का? त्यांनी मग गिरीशला विचारलं, तर तो म्हणाला ओके.”
पल्लवी पुढे त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल म्हणाल्या, “त्यावेळी आमच्यात काही बोलणं झालं नाही. पण, मी माझ्या मैत्रिणीला फोनवर म्हटलं, तुला माहितीये का माझ्या शेजारी कोण बसलंय. ती म्हणाली, काय आहे कोण बसलंय उगाचंच काहीतरी. तर मी म्हटलं की, अगं डॉक्टर गिरीश ओक आहेत माझ्या शेजारी. तीपण एकदम शॉक झाली आणि म्हणाली, तू बोललीस का त्यांच्याशी? म्हटलं नाही अजून तरी नाही. फक्त मुंबईत वांद्रे येथे आल्यानंतर का माहीत, मी त्याला म्हटलं की, मला तुमचा फोन नंबर मिळेल का? आणि त्यानं नंबर दिला मला.”
कुटुंबीयांचा होता विरोध
वाहिनीने शेअर केलेल्या अजून एका व्हिडीओमध्ये संकर्षण गिरीश ओक व पल्लवी यांच्या लग्नाचा फोटो दाखवताना दिसतो. त्यावर गिरीश ओक म्हणतात. “अरे वा.. लग्नातला फोटो आहे हे कोणीही सांगेल. मंगळसूत्र घालतोय मी तिच्या गळ्यात. सांगलीत झालेलं लग्न.” पुढे पल्लवी म्हणातात, “अतिशय नाट्यमय रीतीने झालेलं लग्न.” त्यावर संकर्षण “नाट्यमयरीतीने म्हणजे?” असं विचारतो. गिरीश ओक याबद्दल म्हणातात, “हो म्हणजे विरोधात जाऊन सगळं झालं. कारण- तिच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं. आता गोष्टी सगळ्या बदलल्या. आता मी त्यांना आपलंसं करून घेतलं.”
दरम्यान, गिरीश ओक व पल्लवी यांनी २००८ साली लग्न केलं. गिरीश ओक यांचं हे दुसरं लग्न असून, त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगीसुद्धा आहे. त्यांची मुलगी अभिनेत्री गिरिजा ओक मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर गिरीश व पल्लवी यांनादेखील दुर्गा नावाची एक मुलगी आहे. आता त्यांच्या लग्नाला १५ वर्षं होऊन गेली आहेत.