Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या लक्ष्मीची धाकटी सून सिंचना घर सोडून गेल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळत आहे. हरिषला बिझनेसमध्ये तोटा होतो, त्यामुळे तो बायकोचे दागिने तिच्याही नकळत चोरतो आणि दुकानात नेऊन विकतो. आपले खरे दागिने घरात नाहीयेत ही गोष्ट सिंचनाच्या लक्षात येते आणि ती प्रचंड संतापते.
सिंचना सुरुवातीला मोठ्या जाऊबाई वीणावर चोरीचा आळ घेते. मात्र, त्यानंतर हरिषने तिचे दागिने दुकानात जाऊन विकल्याचा व्हिडीओ तिच्यासमोर येतो. आपल्याच नवऱ्याने अशाप्रकारे चोरून दागिने विकले हे सत्य समोर येताच सिंचना घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. घराबाहेर पडताना वीणाची माफी मागून सिंचना घर सोडते. तसेच, यापुढे हरिषबरोबर राहण्याची अजिबात इच्छा नाहीये असं ती लक्ष्मीला सांगते.
सिंचना घर सोडून गेल्यामुळे लक्ष्मी प्रचंड दु:खी होते. मात्र, आता लवकरच लक्ष्मीला सिंचनाचं घर सोडून जाण्याचं खरं कारण समजणार आहे. आता पैशांसाठी चुकीचं वागणाऱ्या हरिषला लक्ष्मी चांगलीच अद्दल घडवणार आहे. ती आपल्या मुलाची चूक अजिबात पाठिशी घालत नाही याउलट सुनेला खंबीरपणे साथ देते. हरिष खोटं बोलल्यामुळे लक्ष्मी त्याला झाडू घेऊन चांगलंच बदडून काढणार आहे.
हरिषला चांगलीच अद्दल घडवून लक्ष्मी त्याला मारत-मारत सिंचनासमोर घेऊन जाते. यानंतर सिंचनाच्या कुटुंबीयांसमोर तिची माफी माग असंही सांगते. यादरम्यान, गाडेपाटील नेमकं काय झालंय याबद्दल लक्ष्मीकडे चौकशी करतात. यानंतर लक्ष्मी हरिषवर चिडून म्हणते, “नाक घासून सिंचनाची माफी माग आणि तिचे बाबा काहीतरी विचारत आहेत, त्याचं उत्तर दे…बोल हरिष”
आईचा संताप पाहून हरिष पुढे म्हणतो, “मला माफ कर सिंचना मला पैशांची गरज असल्याने मी तुझे दागिने विकले.” लक्ष्मी हे ऐकून म्हणते, “फक्त विकले नाहीत चोरुन विकले…” यादरम्यान लक्ष्मीला अश्रू अनावर होतात. मालिकेचा हा विशेष भाग ८ आणि ९ मे रोजी प्रसारित केला जाणार आहे.
दरम्यान, प्रेक्षकांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “असे असावे आई-बाबा आणि संस्कार”, “हिच खरी आई आणि हेच खरे संस्कार”, “सासू मुलाला डावलून सुनेची बाजू घेतेय…किती सुंदर संदेश दिलाय”, “मस्त लक्ष्मी असंच पाहिजे”, “यांची पोरं कसली विचित्र आहेत” अशा कमेंट्स या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.