Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या जान्हवी तिच्या विकृत नवऱ्याला म्हणजेच जयंतला सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवीच्या कॉलेजमध्ये जयंतला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलेलं असतं. याच ठिकाणी तो जानूच्या सुरेल आवाजातील गाणं ऐकतो. जयंत पहिल्या नजरेतच जान्हवीच्या प्रेमात पडतो. यानंतर रितसर दळवी कुटुंबीयांच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घालतो.
सुरुवातीला चांगलं वागणाऱ्या जयंतचं हळुहळू विकृत रुप जान्हवीच्या समोर येऊ लागतं. या सगळ्यात विश्वा आणि जान्हवी एकमेकांपासून दुरावतात. विश्वाचं जानूवर मनापासून प्रेम असतं पण, तिचं लग्न ठरल्यावर तो आपल्या मनातील भावना व्यक्त करत नाही. तिच्याशी सगळा संपर्क तोडतो, जान्हवीच्या कॉल, मेसेजला उत्तरही देत नसतो. अशातच विश्वाचा कामानिमित्त जान्हवीच्या नवऱ्याशी म्हणजेच जयंतशी संबंध येतो.
जयंत आणि विश्वा दोघंही एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असतात. त्यामुळे आता लवकरच जान्हवी आणि विश्वाची समोरासमोर भेट होणार आहे. यावेळी जानू त्याला मैत्रीच्या हक्काने जाब विचारणार आहे. इतके दिवस संपर्कात का नव्हतास, माझ्या फोन कॉल्सना-मेसेजला उत्तर का दिलं नाहीस…असे अनेक प्रश्न जान्हवी विश्वाला विचारत असते. यानंतर जान्हवी त्याला विचारते, “तू इथे का आलास? हे माझ्या नवऱ्याचं जयतचं ऑफिस आहे” यावेळी विश्वाचे डोळे काहीसे पाणावतात. विश्वाचे दोन्ही हात रागाने धरून जान्हवी त्याला जाब विचारणार असते इतक्यात मागून जयंतची एन्ट्री होते. तो ‘मिस्टर देशमुख’ असा आवाज देत ऑफिसमध्ये एन्ट्री घेतो.
जयंतला अचानक आल्याचं पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात. कारण, आपला नवरा किती संशयी आहे याची पुरेपूर जाणीव तिला असते. विश्वा सुद्धा जयंतला पाहून घाबरतो. आता जान्हवी-विश्वाला एकत्र पाहून जयंत काय प्रतिक्रिया देणार? तो चिडणार, आदळआपट करणार की जान्हवीला एखादी नवीन शिक्षा देणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
जयंतच्या मनात विश्वाबद्दल संशय निर्माण झाल्यास पुढे त्यांच्या बिझनेस डीलचं काय होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. हा विशेष भाग ४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे.