Lakshmi Niwas fame actors expressed thoughts on Marathi language: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील लक्ष्मी, श्रीनिवास, जान्हवी, आनंदी, सिद्धू, भावना, व्येंकी, पूर्वी, मंगल, हरिश, वीणा, जयंत अशी सर्वच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसत आहे.
मालिकेत सध्या भावना व सिद्धू यांच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. अनेक अडचणीनंतर सिद्धूचे भावनाशी लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. भावना मनापासून या लग्नाला तयार नव्हती असे पाहायला मिळाले. पण, सिद्धू तिला वेळोवेळी साथ देत असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र, मालिकेतील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. हिंदी भाषा सक्तीमुळे सर्व स्तरातून विरोध केला जात होता. अनेक कलाकारांनीदेखील यावर वक्तव्य केले होते. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी ‘तारांगण’शी संवाद साधताना मराठी भाषेविषयी वक्तव्य केले आहे.
“माझ्या वडिलांचं कन्नड भाषेत…”
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत मंगलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल म्हणाली की, माझं मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे. माझं शिक्षण मराठीतून झालेलं आहे. माझ्या वडिलांचं कन्नड भाषेत शिक्षण झालं आहे, कारण ते हुबळी धारवाडचे आहेत. आई बेळगावची आहे. आम्ही घरामध्ये मराठी बोलतो. मराठीबद्दल मला प्रचंड अभिमान आहे.
हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी अनाहूतपणे माझ्यासमोर कुठल्याही भाषेतील माणूस असला तरी मी त्याच्याशी मराठीत बोलायला लागते. माझा जन्म मुंबईत झाला आहे, तर मला इतर कुठल्याही भाषेबद्दल विचारणं चुकीचं ठरेल.”
“आपण आपल्या मराठी भाषेसाठी काय करतो हा मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटतो”
तुषार दळवी म्हणाले, “आपण आपल्या मराठी भाषेसाठी काय करतो हा मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटतो. मराठी भाषिक नसलेले अनेक कलाकार आहेत, ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना मराठी येत नाही, त्यांना यायला हवं हे मान्य आहे. पण, जे मराठी असून तेसुद्धा मराठी नीट बोलत नाहीत, त्यांचं काय करायचं? माझ्या दृष्टीने हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे.
“आपण मराठी आहोत. चार-चौघांत बोलताना, वावरताना आपण मराठीबद्दल न्यूनगंड बाळगतोय का? दुर्दैवाने असे लोक आहेत. माझ्या ओळखीचे, मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कित्येकवेळा मला असंही ऐकावं लागतं की तू मराठी बोलतोस, समोरचा मराठी आहे की नाही हे बघत नाही. मी त्यांना सांगतो की मी प्रयत्न नक्की करणार.”
ते पुढे म्हणाले, “माझी मातृभाषा आहे, मुंबईत, महाराष्ट्रात मी मराठीच बोलणार. मी जेव्हा दिल्लीत किंवा चेन्नईत जातो, तेव्हा मी मराठी बोलत नाही. पण, महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे. ज्यांना येत नाही, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मात्र, मराठी लोक जेव्हा मराठीची किंमत करत नाहीत, तेव्हा मला वाईट वाटतं. मराठीबरोबर दुजाभाव करतात, त्यावर माझा जास्त आक्षेप आहे”, असे म्हणत तुषार दळवींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.