Lakshmi Niwas fame Divya Pugaonkar shares video: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सध्या विविध घटना घडत असल्याचे दिसत आहे. भावनाने सिद्धूसमोर तिचे प्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्यातील जवळीकता वाढताना दिसत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लक्ष्मी व श्रीनिवास हे मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडपे आहे. त्यांना मंगल, संतोष, भावना, हरीश व जान्हवी अशी पाच मुले आहेत. तसेच, बोलता न येणाऱ्या व्येंकीलादेखील ते मुलगा मानतात. या कुटुंबात आनंद राहावा, यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसतात. मात्र, लक्ष्मी व श्रीनिवासच्या या कुटुंबावर सतत काही ना काही संकटे येत असतात आणि त्यांचा ते सामना करताना दिसतात.
नुकतेच जान्हवीने जयंतच्या विचित्र वागण्याला कंटाळून त्याच्यासमोरच समुद्रात उडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर तिचा शोध लागला नाही. जेव्हा जयंतने लक्ष्मी-श्रीनिवासच्या कुटुंबाला जान्हवी सापडत नसून, ती सर्वांना सोडून गेली आहे, असे सांगितले तेव्हा दळवी कुटुंबाला धक्का बसला. तसेच, लक्ष्मीने जयंतच्या कानाखाली मारल्याचेदेखील दिसले.
लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवी ही भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकरने साकारली आहे. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती जान्हवीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तसेच ती भिजली असल्याचेदेखील दिसत आहे. हा व्हिडीओवर तिने ‘आँखो की गुस्ताखियाँ’ हे गाणे लावले आहे.
नेटकरी म्हणाले…
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ते काय म्हणालेत जाणून घेऊ…
एका नेटकऱ्याने लिहिले, “तू कुठे हरवलीस गं? जयंत तुला शोधत आहे आणि तू इकडे रील बनवत आहेस”, असे लिहीत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या गेल्या आहेत. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही आता मालिकेत पुन्हा येणार नाही का?”, एका नेटकऱ्याने लिहिले, “याचा अर्थ ही समुद्रात पडल्यानंतर वाचली आणि पाण्यातून बाहेर आली”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अगं जानू, खरंच तुझी आई तुला चांगली ओळखते. बिचारी एकटीलाच माहीत आहे की, तू जिवंत आहेस. गाव फिरून उशिरा घरी येणार”, असे लिहीत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.




तर आणखी काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत. “जयंतच्या त्रासातून मुक्तता झाल्यानंतर स्वर्गातून व्हिडीओ शूट करतेवेळी”, “जानू लक्ष्मी निवासमध्ये परत ये”, “अरे, जानू समुद्रातून बाहेर आली”, “आता कमबॅक करा”, “जानू पाण्यातून बाहेर आली. आता लपून बस”, “जानू, काळजी करू नकोस, तुला विश्वा न्यायला येईल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, जान्हवी पुन्हा मालिकेत कधी दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
