Lakshmi Niwas fame Meenakshi Rathod: ‘लक्ष्मी निवास’ या महामालिकेत अनेक कलाकार काम करताना दिसत आहे. लक्ष्मी व श्रीनिवासचे मोठे कुटुंब, सिद्धूचे कुटुंब, लक्ष्मीच्या भावाचे कुटुंब, आनंदीच्या आत्याचे कुटुंब तसेच जयंत-जान्हवीचा छोटा संसार मालिकेत पाहायला मिळते. त्यामुळे या मालिकेत अनेक कलाकार काम करताना दिसत आहेत.
लक्ष्मी निवास या मालिकेत लक्ष्मी व श्रीनिवास यांची काही छोटी स्वप्ने असल्याचे पाहायला मिळते. त्यांना त्यांच्या हक्काचे स्वत:चे घर बांधायचे आहे. तसेच, ते स्वत:च्या स्वप्नांसाठी कष्ट घेताना दिसतात. अनेकदा त्यांच्या घरात वाद-विवाद, भांडणे, गैरसमज, ईर्ष्या अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पण, लक्ष्मी व श्रीनिवास सर्वांना सांभाळून घेत, प्रेमाने कधी रागाने समज देतात.
“आधी लोक मला…”
लक्ष्मी व श्रीनिवास यांची मोठी सून वीणादेखील घरच्यांना सांभाळून घेत, सासूप्रमाणे घरातील सर्वांची मने जपत संसार करते. तिचा नवरा संतोष पैशाच्या लोभापायी अनेक चुकीच्या गोष्टी करतो. पण, वीणा त्याला वेळोवेळी समजावते, प्रसंगी त्याच्या विरोधात जाते. तसेच, संपूर्ण घराची जबाबदारी घेते.
वीणा ही भूमिका अभिनेत्री मिनाक्षी राठोडने साकारली आहे. आता अभिनेत्रीने नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा असतात, याबद्दल खुलासा केला.
मीनाक्षीला विचारले की तू आतापर्यंत ज्या भूमिका साकारल्यास, त्या भूमिकांना आलेली प्रेक्षकांची कोणती प्रतिक्रिया आठवणीत आहे? त्यावर अभिनेत्री म्हणाली, “किस्सा असा नाही. पण, देवकीच्या बाबतीत मला असे खूप अनुभव आले की ती बावळट, वेंधळी होती. तर त्यावेळी मला कोणी भेटलं तर त्यांच्या नजरेत असं असायचं की तुम्ही टीव्हीमध्ये दिसता तशाच वेंधळ्या, बावळट आहात का? भेटल्यानंतर आधी लोक मला जज करायचे. तर ते मजेशीर वाटायचं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी आता वीणाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या मला अशा प्रतिक्रिया येतात की अशीच साधी, सोज्वळ एक सून घरात असावी. “
याच मुलाखतीत अभिनेत्री असेही म्हणाली, “जेव्हा या मालिकेसाठी मला विचारणा झाली होती, तेव्हा छान वाटलं होतं. मी एका प्रतिष्ठित चॅनेलवर काम करायला मिळतंय, याचा आनंद होता. प्रोडक्शन वेगळं होतं. मी सुनील सरांना ओळखत होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा होती. ती इच्छा या भूमिकेमुळे पूर्ण झाली. विशेष म्हणजे वीणा हे पात्र खूप इंटरेस्टिंग होतं, माझी जी प्रतिमा निर्माण झाली होती, त्याहून वेगळं होतं. त्यामुळे मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली. तेव्हा मी डोळे झाकून होकार दिला.”
दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना दिसतात. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.