Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ या कौटुंबिक मालिकेतील जयंत ही भूमिका पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्याचा विकृत स्वभाव, बायकोवर संशय घेणं या सगळ्या गोष्टींची नेहमीच सर्वत्र चर्चा होते. पण, जयंतच्या या विकृतीमागे भूतकाळातील खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. याचा शोध लवकरच जान्हवी घेणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीने शेअर केला आहे.
जान्हवी आणि जयंतच्या घरी काही दिवसांपूर्वीच सशाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या सशाला जानू प्रेमाने ‘बबुच्का’ म्हणत असते. दिवसरात्र ती सशाची काळजी घेते आणि बायकोचं हेच वागणं जयंतला खटकतं. यामुळे जयंत बबुच्काचा कायमचा बंदोबस्त करायचा असं ठरवतो. जान्हवीला सुद्धा नवऱ्याच्या वागण्याबोलण्यात शंका येऊ लागते आणि जयंत सशाला काही करणार तर नाही ना अशी भीती तिच्या मनात निर्माण होते.
जयंतचं वागणं दिवसेंदिवस जान्हवीसाठी त्रासदायक ठरत असतं. यामुळे ती एका जागी बसून सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. लग्नानंतर पहिल्याच दिवशी जयंतने दुधात टाकून झुरळ खाल्लेलं असतं. याशिवाय बायको पार्टीत सर्वांसमोर गाणं गाते ही गोष्ट त्याला पटत नाही. म्हणून तो जानूला शिक्षा देऊन रात्रभर गाणं गायला सांगतो. तिची प्रकृती बिघडते, तेव्हा त्याला केलेल्या चुकीची जाणीव होते.
संपूर्ण घरात जान्हवीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. जान्हवीचा मित्र चुकून घरात शिरतो, त्यालाही जयंत बेदम मारहाण करतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जान्हवीच्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, कोणताही साधा मनुष्य अशा गोष्टी करत नाही. शिवाय जयंत सगळे काळे कपडेच घालत असतो याचा शोध लवकरच जान्हवी घेणार आहे.
जयंत आणि वेंकी बालपणापासून एकत्र असतात ही गोष्ट अजूनही जानूला माहिती नसते. वेंकी दादा जयंतला आधीपासूनच ओळखतो आणि जयंतने वेंकीला मारण्याचा देखील प्रयत्न केलाय हे सत्य जेव्हा जानूला समजेल तेव्हा तिच्यासमोर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. ज्या आश्रमात जयंत मोठा झालेला असतो तिथे नेमकं काय घडलेलं असतं? हा सगळा विचार करून जान्हवी आता मनातल्या मनात ठाम निश्चय करत ठरवते, “जयंतच्या भूतकाळात नक्की काय घडलं होतं? आता बास जयंतचा भूतकाळ मी काहीही झालं तरी शोधून काढणारच”
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत येत्या १५ जुलैपासून जयंतचा भूतकाळ शोधून काढण्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. आता विकृत नवऱ्याला भानावर आणण्यात जानूला यश मिळेल का? जयंतच्या भूतकाळात नेमकं काय घडलेलं असेल? याचा उलगडा लवकरच मालिकेत होईल. ही मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.