Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच जान्हवीला जयंतच्या भूतकाळाविषयी सगळी माहिती मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. आपला नवरा इतका विक्षिप्तपणे का वागतो? याचा शोध घेण्यासाठी जान्हवी जयंतचं बालपण ज्याठिकाणी गेलं त्या आश्रमात जाते. तिथे गेल्यावर जयंतचे आजोबा अतिशय कडक शिस्तीचे होते, या सगळ्याचा त्याच्या बालमनावर कसा परिणाम झाला हा सगळा भूतकाळ जान्हवीसमोर उघड होतो.
जयंतचा भयंकर भूतकाळ समजल्यावर जान्हवी स्वत:च्या नशिबाला दोष देऊन रडू लागते. पण, आता रडून उपयोग नाही. काही करून आपण जयंतच्या स्वभावात सुधारणा करायची असा निर्णय जान्हवी घेते. पण, प्रत्यक्षात जयंत काही केल्या सुधारण्याचं नाव घेत नाहीये.
जान्हवी जयंतशी चर्चा करून माझ्याशी मनमोकळेपणाने वाग, सगळ्या गोष्टी माझ्याशी बोल असं त्याला सांगते. पण, जयंत तिला म्हणतो, “माझं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे मी तुला आवडणार नाही असं काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आपण घरात जयंतवाणी लावूयात. यामुळे तुला माझ्या मनातील आवाज जयंतवाणीच्या रुपात ऐकायला येईल. जयंतवाणीनुसार तुला इथून पुढे वागावं लागेल” जयंतची हीच अट मान्य केल्यामुळे आता जान्हवीची चांगलीच कोंडी होणार आहे. कारण, आता जयंत स्वत:च्या राहत्या घरात ‘जयंतवाणी’ हा नवा खेळ सुरू करणार आहे.
काही दिवसांपूर्वी जान्हवीला आवडतो म्हणून जयंतने ससा घरात आणला होता. यानंतर जानूने या सशाचं प्रेमाने ‘बबुच्का’ असं नावं ठेवलं होतं. ससा आणि जान्हवीचं प्रेमाचं बॉण्डिंग जयंतला बघवत नसतं. त्यामुळे आता जयंतने बायकोला छळण्यासाठी घरात उंदीर आणलाय. जान्हवी उंदराला प्रचंड घाबरत असते. पण, जयंतवाणीनुसार तिला सगळ्या गोष्टी ऐकणं भाग असतं. उंदराला जवळ घे, त्याला भरव असे आदेश जान्हवीला जयंतवाणीच्या माध्यमातून दिले जातात. पण, एका क्षणानंतर जान्हवी प्रचंड रडते.
तरीही, जयंतला बायकोची दया येत नाही. “तुलाच हवं होतं मी मनमोकळेपणाने बोलावं त्यामुळे आता जयंतवाणीनुसार सगळं ऐकावं लागेल जानू नाहीतर मी तुला मदत केली असती” असं जयंत तिला खोटं-खोटं सांगतो. पण, प्रत्यक्षात जयंतवाणी वगैरे हा सगळा प्लॅन आपल्याच नवऱ्याचा आहे ही गोष्ट जान्हवीच्या लक्षात आलेली असते.
आता या जयंतवाणीमुळे जान्हवीचं जगणं आणखी कठीण होऊन बसणार आहे. आता ती या सगळ्यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय, दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास भावनाच्या सासरी जाणार आहेत. यावेळी या दोघांना पुन्हा एकदा सिद्धूची आजी आपमानित करते. आता या सगळ्यावर सिद्धू काय उत्तर देणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

दरम्यान, प्रेक्षकांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. “जयंत हे बंद कर”, “जान्हवी तू अडाणी आहेस का”, “किती सहन करणार या जयंतचं?”, “अरे हे काय सुरूये हसावं की रडावं तेच कळत नाहीये”, “जयंतला जान्हवीने सोडून दिलं पाहिजे अजून किती सहन करणार” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.