Lakshmi Niwas Promo : जयंतचा वाईट भूतकाळ, त्याचा कपटी अन् विकृत स्वभाव या सगळ्याचा उलगडा अखेर जान्हवीसमोर झालेला आहे. जयंतचं भयानक रूप समोर येताच जान्हवीच्या पायाखालची जमीन सरकते. इतकंच नव्हे तर, जानूच्या आजीला सुद्धा जयंतने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
गरोदर असताना जान्हवीला जयंतबद्दलचं आणखी एक गुपित समजण्याची दाट शक्यता आहे. जयंतच्या विकृत स्वभावामुळे लहानपणी तो वेंकीला खड्ड्यात ढकलतो आणि यामुळेच वेंकीची वाचा गेलेली असते. आपल्या नवऱ्याने सर्वांनाच त्रास दिलाय ही गोष्ट समजल्यावर जान्हवी प्रचंड संतापते. आता काही करून जयंतला धडा शिकवायचा असा निर्णय ती घेते.
जयंतमुळे आजवर अनेकांना त्रास झालेला असतो. त्यामुळे आता जयंतरूपी रावणाचं दहन करायचं असा निर्णय जानूने घेतला आहे. ती मनोमन विचार करते, “आता बास झालं…आतापर्यंत मी जयंतचे सगळे गुन्हे, सगळ्या चुका पोटात घातल्या. पण आता शिक्षा देण्याची वेळ आलीये. इथून पुढे तू माझं वेगळंच रूप पाहशील.” यानंतर जान्हवीने रागात जयंतच्या फोटोवर अग्निबाण सोडल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग ९ ऑक्टोबरला प्रसारित करण्यात येणार आहे.
जान्हवीचा हा रुद्रावतार पाहून नेटकरी प्रचंड आनंदी झाले आहे. कारण, आजवर जानूने नेहमी जयंतला चुकीच्या गोष्टीत साथ देऊन त्याच्या सगळ्या चुका पोटात घातल्या आहेत. इतकंच नव्हे तर, जयंतने दिलेल्या सगळ्या शिक्षा देखील तिने निमुटपणे भोगल्या आहेत. मात्र, नवऱ्याने आजीवर हल्ला केल्यावर आणि वेंकीची वाचा घालवण्यासाठी सुद्धा जयंतच जबाबदार असल्याचं समजल्यावर आता जान्हवी प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
“हे वेगळं रूप कायम असंच वेगळंच राहू दे जान्हवी…परत कधीही आधीच्या रूपात येऊ नकोस”, “अरे वाह किती दिवसांनी पॉझिटिव्ह प्रोमो दिसला”, “किती वेलडन खूप छान”, “लेखकांंचं आता कौतुक केलं पाहिजे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
याशिवाय असंख्य नेटकऱ्यांनी या प्रोमोच्या कमेंट्समध्ये ‘लक्ष्मी निवास’ची लेखिका सायली केदारला सुद्धा टॅग केलं आहे. सायलीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांसाठी लेखिका म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.