Lakshmi Niwas Jahnavi New Look Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून जान्हवी जयंतला सोडून गेल्याचा ट्रॅक सुरू असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जयंतला कंटाळून जान्हवी पाण्यात उडी मारते. विकृत जयंत आपल्या पत्नीला शोधण्याचा बराच प्रयत्न करतो मात्र, या सगळ्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. शेवटी जानू कायमची सोडून गेल्याचं सत्य जयंत लक्ष्मीला सांगतो.

आपली मुलगी कायमची आपल्याला सोडून गेल्याचं दु:ख लक्ष्मीला सहन होत नाही. ती प्रचंड खचते. याशिवाय जान्हवीच्या आठवणीत जयंत सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे. यादरम्यान या सगळ्या घडामोडी भावना-सिद्धूला समजतात, ते दोघंही लक्ष्मीजवळ घडल्या प्रकाराची चौकशी करत असतात. आपण काहीही करून जान्हवीला शोधून काढू असा विश्वास यावेळी सिद्धू व्यक्त करतो. पण, जान्हवी यापैकी कुणालाच सापडणार नाहीये…आणि मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

जान्हवी विश्वाच्या वडिलांना म्हणजेच लक्ष्मीच्या सख्ख्या मोठ्या भावाला भेटते. पाण्यात उडी मारल्यामुळे तिची शुद्धा हरपलेली असते. जानू यानंतर गुपचूप विश्वाच्या वडिलांच्या गाडीत लपून बसते असं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर, जान्हवी त्यांचा जीव सुद्धा वाचवते. यामुळेच दिग्विजय देशमुख तिला स्वत:च्या घरी आणतात.

दिग्विजय देशमुख जान्हवीची ओळख त्यांच्या पत्नीला ही तनुजा आहे अशी करून देतात. जानू आता एका वेगळ्या रुपात मालिकेत परतली आहे. तिचं नाव-रूप सगळंच बदलल्यामुळे आता दळवी कुटुंबीय तिला कसं शोधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मात्र, यादरम्यान आणखी एक ट्विस्ट या मालिकेत येईल. तो म्हणजे दिग्विजय देशमुख हे विश्वाचे वडील असतात. विश्वा जेव्हा जान्हवीला पाहणार तेव्हा नेमकं काय घडणार? या दोघांची मैत्री पुन्हा जमेल की, जान्हवीला स्मृतीभ्रंश झालाय? हे ‘लक्ष्मी निवास’च्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

दरम्यान, जानूच्या रिएन्ट्रीचा हा विशेष भाग प्रेक्षकांना येत्या ३० ऑक्टोबरला रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आम्हाला माहिती होतं जानू परत येणार”, “खतरनाक ट्विस्ट…मजा आली”, “भारी टर्निंग पॉईंट”, “जानू आणि विश्वाची जोडी जमेल आता”, “जान्हवीची स्मृती गेलीये असंच वाटतंय”, “बापरे काय ट्विस्ट आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.