Lakshmi Niwas Promo 8 Aug 2025 : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत वेंकी आणि आरती हे दोघंही नुकतेच घर सोडून गेल्याचं पाहायला मिळालं. वेंकीला किती दिवस आई-बाबा फुकट पोसणार आणि आता त्याची बायको आरतीही आमच्या घरात फुकट राहतेय त्यामुळे काही करून या नवरा-बायकोला घराच्या बाहेर काढायचं असं संतोष ठरवतो. हरीशला हाताशी घेऊन संतोष वेंकीला नको-नको त्या गोष्टी बोलून दाखवतो. तसंच आरतीचाही अपमान करतो.
वेंकी घर सोडून जावा यासाठी संतोष त्याला शपथ घालतो. आता घरात आणखी वाद नको असा विचार करून वेंकी आणि आरती रात्रीच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. वेंकी हा अनाथ असतो त्यामुळे लक्ष्मीने बालपणापासून पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केलेला असतो. त्यामुळे अचानक घर सोडून जाताना वेंकीला अश्रू अनावर होतात.
वेंकी आणि आरती घराला शेवटचं डोळे भरून पाहत असतात इतक्यात लक्ष्मी आणि श्रीनिवास बाहेर येतात. हा सगळा संतोषचा डाव असल्याचं दोघांनाही लक्षात येतं.
आम्ही आमच्याकडचे सगळे पैसे तुला देतो पण, वेंकी आणि आरती हे घर सोडून जाणार नाहीत असं श्रीनिवास संतोषला ठामपणे सांगतात. पण, वेंकी या गोष्टीला विरोध करतो आणि घर सोडतो. संतोषची नाटकं दिवसेंदिवस वाढत जात आहेत. त्याच्या कपटी स्वभावाला लक्ष्मी सुद्धा कंटाळलेली असते. त्यामुळे आता संतोषला अद्दल घडवण्यासाठी मालिकेत एक खास व्यक्ती येणार आहे.
तेजश्री प्रधानची एन्ट्री
लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून तिची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी तेजश्रीने स्वानंदीच्या रुपात संतोषला अद्दल घडवण्यासाठी ‘लक्ष्मी निवास’मध्ये एन्ट्री घेतली आहे.
तेजश्री सांगते, “मी स्वानंदी सरपोतदार मुंबईवरून आलेय. आमच्या इकडच्या एका आजी-आजोबांची संतोष दळवींनी फसवणूक केलीये. मला पोलिसांना बोलवावं लागेल आणि आता हा प्रश्न पोलीस सोडवतील.” यावेळी संतोषच्या चेहऱ्यावर सुद्धा बारा वाजलेले असतात. आता या घटनेनंतर संतोष आई-बाबांची माफी मागणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ८ ऑगस्टच्या भागात तेजश्री ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एन्ट्री घेईल. प्रेक्षकांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत स्वानंदीने या संतोषला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या आहेत.