Marathi Actress Dance Video : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दुपारच्या सत्रात ‘लपंडाव’ ही मालिका प्रसारित केली जाते. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले, कृतिका देव आणि अभिनेता चेतन वडनेरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कृतिका देव यामध्ये सखीची भूमिका साकारत आहे. अभिनेत्रीने नुकताच एका बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘लपंडाव’ मालिकेतील कृतिका देव ( सखी ) आणि समृद्धी दंडगे ( जान्हवी ) या दोघींनी मिळून अनुष्का शर्माच्या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे; याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अलीकडच्या काळात इन्स्टाग्राम रील्सवर अनेक जुनी गाणी व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून Oye Boy Charlie हे गाणं सुद्धा सर्वत्र ट्रेंड होत आहे. याच गाण्यावर कृतिका व समृद्धी या दोघींनी मिळून जबरदस्त डान्स केला आहे.
Oye Boy Charlie हे गाणं २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मटरू की बिजली का मंडोला’ या सिनेमातील आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, यातील Oye Boy Charlie हे गाणं सर्वत्र तुफान हिट झालं होतं. या सिनेमात अनुष्का शर्मा, इम्रान खान, पंकज कपूर, शबाना आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कृतिका व समृद्धी या दोघीही जबरदस्त एनर्जीने या गाण्यावर थिरकल्या आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत या दोन्ही अभिनेत्रींचं भरभरून कौतुक केलं आहे. कृतिकाचा नवरा अभिषेक देशमुख कमेंट करत म्हणतो, “दोघींची एनर्जी लेव्हल कमाल आहे…”, तर अन्य चाहत्यांनी या व्हिडीओवर “खूप सुंदर”, “दोघीही भारी नाचल्या”, “कमाल डान्स” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, ‘लपंडाव’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका दुपारी २ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते. या मालिकेत नुकताच एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सखीची खरी आई सरकार नसते तिचं नाव असतं मनस्विनी. या मनस्विनीने गेली अनेक वर्षे सखीच्या खऱ्या आईला म्हणजेच तेजस्विनीला आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं. आता सखीला तिच्या खऱ्या आईचं प्रेम केव्हा मिळणार, तिची सुटका कोण करणार हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.
