ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मात्र, गेल्या अडीच वर्षात ज्योती चांदेकर प्रेक्षकांच्या लाडक्या ‘पूर्णा आजी’ झाल्या होत्या. ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्णा आजीची भूमिका प्रत्येकाला भावली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच, मालिकेतील त्यांचे सहकलाकार, त्यांचे चाहते या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता.
आज ‘ठरलं तर मग’ मालिकेने ९०० भाग पूर्ण केले आहेत. मात्र, हा महत्त्वाचा क्षण साजरा करण्यासाठी आपल्याबरोबर पूर्णा आजी नाहीये…याचं दु:ख मालिकेच्या संपूर्ण टीमला आहे. सेटवर पूर्णा आजीच्या नावाने, तिच्या आठवणीत सदाफुलीचं रोपटं लावण्यात आलं आहे. याचा फोटो जुई गडकरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, “आज ९०० भाग पूर्ण झालेत…हे बघायला ती हवी होती, पण तिचे आशीर्वाद नक्कीच आहेत” असं जुईने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
जुईची ही भावनिक पोस्ट रिशेअर करत तेजस्विनी पंडितने मालिकेच्या सर्व कलाकारांना धीर दिला आहे. “तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण, तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच राहील- जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम…” असं तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ज्योती चांदेकर-पंडित आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं. या सिनेमासह ज्योती चांदेकर यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण साकारल्या आहेत.

याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. तसेच ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.