Laxmi Niwas Fame Anuj thakre’s Wife Praises him : ‘लक्ष्मी निवास’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अनेक लोकप्रिय कलाकार यामधून महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकत आहेत. ‘झी मराठी अवॉर्डस २०२५’निमित्त सगळेच एकत्र जमल्याचे पाहायला मिळाले. अशातच यानिमित्त मालिकेत हरीश हे पात्र साकारणारा अभिनेता अनुज ठाकरे याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीबद्दल सांगितलं आहे.

‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त अनुज व त्याच्या पत्नीने ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये अनुजची पत्नी अश्विनी गोरलेने नवऱ्याचं कौतुक केलं आहे. अश्विनीनं अनुजला मालिकेतील भूमिकेसाठी नॉमिनेशन मिळाल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी खूप उत्सुक आहे. कारण- अनुजला नॉमिनेशन मिळालं आहे. त्याचं ‘झी मराठी’बरोबर काम करण्याचं स्वप्न होतं आणि ‘झी मराठी’बरोबर काम केल्यानंतर आम्हाला अपेक्षाही नव्हती की, त्याला नॉमिनेशन मिळेल.”

नॉमिनेशन मिळाल्यानंतर भावुक झालेला अनुज ठाकरे

हरीशची पत्नी पुढे म्हणाली, “जेव्हा त्याला नॉमिनेशन मिळालं तेव्हा त्यानं मला व्हिडीओ कॉल केला आणि तो रडायला लागला. तेव्हा मी म्हटलं की, ही तर सुरुवात आहे. तो जितका अभिनेता म्हणून कमाल आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही कमाल आहे. ही तर सुरुवात आहे. त्याला अजून भरपूर काम करायचं आहे. तो थांबणाऱ्यातला नाहीये.”

पत्नीबद्दल हरीश म्हणाला, “तिच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप ही पुरस्कारापेक्षा कमी नाहीये. कारण- मी संघर्ष करून इथपर्यंत आलो; पण ती शिक्षण घेऊन या क्षेत्रात आली. तिनं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलं असून, ती आज अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे तिला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. मी तिच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकतो.”

दरम्यान, हरीश म्हणजेच अनुज ठाकरेची पत्नीसुद्धा अभिनेत्री असून, ती सध्या ‘झी मराठी’वरीलच ‘तारिणी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ही तिची ‘झी मराठी’वरील पहिली मालिका असल्याचं तिनं या मुलाखतीमधून म्हटलं आहे.