Laxmi Niwas Fame Divya Pugaonkar Praises Meghan Jadhav : ‘लक्ष्मी निवास’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये अभिनेत्री दिव्या पुगावकर व मेघन जाधव महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यांची या मालिकेतील जयंत-जान्हवी ही जोडी सध्या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक आहे. अशातच आता दिव्याने तिच्या ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल सांगितलं आहे.

‘झी मराठी अवॉर्ड २०२५’निमित्त वाहिनीवरील सर्व मालिकांमधील कलाकारांनी ग्लॅमरस लूक करीत हटके अंदाजात हजेरी लावली. त्यावेळी रेड कार्पेटवर दिव्या व मेघन यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये दिव्यानं मेघनबद्दल, तसेच त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितलं आहे.

दिव्या पुगावकरची मेघन जाधवच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल प्रतिक्रिया

दिव्या व मेघन यांनी मुलाखतीत त्यांच्या लूक व नामांकनाबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांना नामांकनं मिळाल्यानंतर पहिला फोन कोणाला केला, असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर दिव्या म्हणाली, “मी सगळ्यात आधी फोन माझ्या नवऱ्याला केला होता. त्याला व्हिडीओ कॉल केला होता. ” मेघन म्हणाला, “आई-वडिलांना, दादाला फोन केला होता.”

दिव्या पुढे मेघनची मस्करी करीत म्हणाली, “अजून कोणाला केला होतास”. त्यावेळी दिव्या मेघनला त्याच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरबद्दल म्हणाली, “कोणाला फोन केला होतास… मला कानात सांग नाही, तर मी माइकवर सगळ्यांना सांगेन”. त्यावर मेघन म्हणाला, “हे असं लपवून थोडीच सांगायचं असतं.” पुढे ती मुलाखतीत, “प्लीज समजून जा तुम्ही” , असं म्हणते. यावेळी दिव्यानं मेघनच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल बोलत त्याची मस्करी केली. पुढे मेघन, “मला तर माहीतच नाही कशाबद्दल चर्चा सुरू आहे”, असं गमतीत म्हणतो. दिव्या त्यावर, “हा तर खूप साधा भोळा आहे”, असं म्हणते.

मेघन जाधवबद्दल दिव्या पुगावकरची प्रतिक्रिया

दिव्याला पुढे मेघन स्क्रीनवर भूमिका साकारतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे का, असं विचारलं होतं. त्याबद्दल ती म्हणाली, “सगळ्यात आधी तर मेघन जयंतसारखा अजिबात नाहीये आणि मेघन नेमका कसा आहे, ते जी कोणी त्याची जोडीदार असेल ती सांगेलच आणि भविष्यात कधीतरी तो मुलाखत देईलच.”