Harshada Khanvilkar Praises Meghan Jadhav : ‘लक्ष्मी निवास’ ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. अशातच आता ‘झी मराठी अवॉर्डस’च्या निमित्ताने या सर्व कलाकारांनी रेड कार्पेटवर एकत्र हजेरी लावलेली. यावेळी मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन जावयाबद्दल सांगितलं आहे.
‘झी मराठी अवॉर्डस २०२५’च्या निमित्ताने या वाहिनीवरील सर्व कलाकार ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाले. यावेळी प्रत्येक मालिकेला वाहिनीकडून एका रंगाची थीम देण्यात आलेली. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला हिरवा रंग देण्यात आलेला. त्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्या रंगाचे विविध प्रकारचे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. त्यानिमित्ताने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी रेड कार्पेटवर ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली.
हर्षदा खानविलकर यांनी केलं मेघन जाधवचं कौतुक
हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, मेघन जाधव, कुणाल शुक्ल, अक्षया देवधर, दिव्या पुगावकर या कलाकारांनी एकत्र मुलाखत दिली. त्यामध्ये हर्षदा व तुषार यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन जावयाचं म्हणजेच मेघन जाधवचं कौतुक केलं आहे. मुलाखतीत दिव्याला अक्षयासाठी सिद्धू ग्रीन फॉरेस्ट आहे; पण जान्हवीसाठी जयंत ग्रीन फॉरेस्ट आहे का याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “तिच्यासाठी तो ब्लॅक फॉरेस्ट आहे.” त्यावर हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “तो झाला जयंतचा भाग; पण मेघनबद्दल विचारशील, तर तो ग्रीन फॉरेस्ट आहे. तो उत्कृष्ट व्यक्तींपैकी एक आहे.”
मेघन खूप जबाबदार मुलगा आहे – तुषार दळवी
हर्षदा पुढे मेघनचं कौतुक करीत म्हणाल्या, “तो खूप चांगला मुलगा आहे. तो त्याच्या आई-बाबांचा मुलगा आहे. खूप जबाबदार मुलगा आहे. त्याच्या पुतण्यांमध्ये रमणारा मुलगा आहे. खऱ्या आयुष्यात तो खूप कमाल माणूस आहे आणि अत्यंत कमाल अशी भूमिका त्याला मिळाली आहे, जी तो लीलया वठवतोय. त्यामुळे लोकांना वाटतंय की, तो खऱ्या आयुष्यातही तसाच असेल बहुतेक. मला वाटतं यासाठी आपण सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं पाहिजे.”
तुषार दळवी मेघनबद्दल म्हणाले, “मेघनबद्दल मला असं वाटतं की, तो खूप शिस्तप्रिय आहे. त्याच्या कामाबद्दल तो खूप प्रामाणिक आहे. तो लहानसहान गोष्टींचा खूप विचार करतो की, हा सीन कसा करता येईल वगैरे.” हर्षदा पुढे म्हणाल्या, “ही गोष्ट कायम त्याच्या डोक्यात असते. तो खूप वर्षांपासून काम करतोय. मी खूप वर्षं काम करतेय; पण मला मुख्य भूमिका मिळायला खूप वर्षं लागली आणि मुख्य भूमिका साकारायला प्रत्येकाला आवडतं. त्यानं तर अगदी लहानपणापासून काम केलेलं आहे आणि तो त्याला कधी अशी भूमिका साकारायला मिळणार याची वाट बघत होता. त्यामुळे आता तो खूप चांगल्या पद्धतीनं ती भूमिका साकारत आहे. ते सोपं नाहीये. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. लोक त्याचा तिरस्कार करतात; पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत आणि हेच त्याचं यश आहे.”