Laxmichya Paulani Serial New Promo : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामधील अभिनेत्री ईशा केसकर व अक्षर कोठारी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत वेगळं वळण आलेलं पाहायला मिळतंय. चांदेकरांना खूप वर्षांपूर्वी दिल्या गेलेल्या शापामुळे आता कुटुंबावर मोठं संकट येणार अशी भीती अद्वैतच्या आजोबांना असते.

चांदेकर कुटुंबावर ओढावलेल्या या संकटाला अद्वैत त्याच्या आजोबांच्या सांगण्यावरून सामोरे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. खूप वर्षांपूर्वी मूर्ती स्थापनेच्या वेळी घडलेल्या अघटित घटनेमुळे तेव्हा गुरुजींनी भालचंद्र (आजोबा) यांना भविष्यात या घटनेचा त्यांच्या पुढच्या पिढीतील मुलांच्या संसारावर परिणाम होणार असल्याचं सांगितलेलं असतं; याबद्दल आजोबा अद्वैतला सांगतात.

अद्वैतला घेऊन ते पुन्हा त्या ठिकाणी जातात, तेव्हा रोहिणीसुद्धा त्यांच्याबरोबर जाते; तेव्हा गुरुजी त्यांना काहीतरी अघटित आणि मोठं होणार असल्याचं सांगतात. यासह ते अद्वैत व त्याच्या आजोबांना सांभाळून राहा आणि माणसांना जपा असा सल्ला देतात. परंतु, चांदेकर कुटुंबातील काही सदस्यांना याबद्दल माहिती नसते. अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये या शापाचं सत्य कलाला कळतं याबद्दल पाहायला मिळत आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये आजोबा घराण्याला असलेल्या शापाबद्दल बोलतात. तेवढ्यात तिथे कला येते, त्यामुळे अद्वैत त्यांना थांबवताना दिसतो. त्यावर कला “कोणता शाप माझ्यापासून लपवताय?” असं म्हणते. त्यावर आजोबा अद्वैतला “आता लपवून फायदा नाही, सांगून टाक” असं सांगतात.

कलासमोर येणार चांदेकर घराण्याच्या शापाचं सत्य

अद्वैत पुढे कलाला “आपल्या घरात कोणाचाही संसार टिकणार नाही असा शाप आहे” असं म्हणतो. ते ऐकून कलाला धक्का बसतो. त्यानंतर अद्वैत तिला सावरताना दिसतो. प्रोमोमध्ये पुढे कला अद्वैतला “घराण्याच्या शापाची एवढी मोठी गोष्ट तू लपवलीस कशासाठी?”, असं विचारते. त्यावर अद्वैत “आपल्या संसारासाठी, मला तुला कोणत्याही परिस्थितीत गमवायचं नाहीये, मला तुझी काळजी होती” असं उत्तर देतो.

अद्वैतचं बोलणं ऐकून कला त्याला “कोणत्याही शापामुळे मी तुझ्यापासून दूर जाणार नाही” असं म्हणते. त्यानंतर दोघे भावुक होऊन एकमेकांना मिठी मारताना दिसतात, त्यामुळे आता घराण्याच्या शापाचं सत्य कलाला कळल्यानंतर ती अद्वैच्यामागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचं पाहायला मिळतं, यामुळे कला-अद्वैत यांचं नातं अजून घट्ट होणार असल्याचं दिसतं.