Madhurani Prabhulkar shares her daughter reaction: अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर ती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

अभिनेत्री सध्या ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकात दिसत आहे. ती वेळोवेळी नाटकाबदद्ल, नाटकांच्या प्रयोगाबद्दल सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत असते. प्रेक्षक जेव्हा नाटकाला मनापासून दाद देतात, काही गोष्टी तिच्या मनाला भावतात, त्यादेखील ती शेअर करते.

आता नाटकाच्या एका प्रयोगानंतर अभिनेत्रीला आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा गोड अनुभव तिला तिच्या लेकीमुळे आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

“मला मिळालेली ही सगळ्यात अमूल्य भेट…”

मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मुलीने तिला घट्ट मिठी मारल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, “‘ज्याचा त्याचा विठ्ठल’च्या प्रयोगानंतर मिळालेली सगळ्यात अमूल्य दाद आहे. भंडारकर इन्स्टिट्यूटच्या समवसरण रंगमंचावर मागच्या शनिवारी प्रयोग झाला. स्वराली हा प्रयोग प्रथमच पाहणार होती. इतके दिवस मी तिला न्यायला थोडी साशंक होते. तिला कळेल का? आवडेल का? सलग पावणेदोन तास बसेल का? अशा अनेक शंका होत्या.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले, “ती आपणहूनच म्हणाली मी येते. ती आली आणि विठ्ठलमय होऊन गेली. या वयात हे नाटक तिने पाहणं आणि तिच्या आत ते खोलवर कुठेतरी उतरणं हे निव्वळ अद्भुत आहे. प्रयोगानंतर ती निःशब्द होती. प्रतिक्रिया म्हणून बराच वेळ नुसती घट्ट मिठी मारून थांबली होती.”

मधुराणीने पुढे या फोटोसाठी आभार मानत लिहिले, “तिच्या चेहऱ्यावरचे हे मुग्ध भाव टिपणाऱ्या माझ्या मित्राची अमित देशपांडेची मी शतशः आभारी आहे. या वर्षातली मला मिळालेली ही सगळ्यात अमूल्य ‘भेट’ आहे”, असे म्हणत मधुराणीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे, तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “नि:शब्द”, “किती गोड पावती आहे ना”, “हे खूप मौल्यवान आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

मधुराणी सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करते, काही वेळा ती कविता सादर करते, काही वेळा मनातील भावना व्यक्त करते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. आता ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.