Priyadarshini Indalkar Shares Her Accident Experience : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून या शोमधून ती घराघरांत पोहोचली. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

नुकत्याच आलेल्या ‘दशावतार’ या सिनेमातील तिच्या भूमिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील तिची वंदू ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. ‘दशावतार’मुळे चर्चेत असलेल्या प्रियदर्शिनीनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या भीषण अपघाताबद्दल सांगितलं आहे. याबद्दल तिनं ‘वेळीच उपचार झाले नसते, तर मी संपले असते’ असंही म्हटलं.

MHJ Unplugged या पॉडकास्टमध्ये प्रियदर्शिनीनं तिच्या भीषण अपघाताबद्दल सांगितलं की, “मी आणि आई पुण्याहून साताऱ्याला जात होतो, तेव्हा वाळुंज या गावाच्या नजीक १५० वेग असताना गाडी मधल्या दुभाजकाला धडकली. मी मागच्या सीटवर झोपले होते. मागच्या सीटवर आडवी झोपल्यानं जेव्हा गाडी धडकली, तेव्हा मी त्या मधल्या पॅसेजमध्ये पडले आणि तिथे एक बंप असतो तो माझ्या पोटाला लागला. यामुळे स्प्लीन (Spleen) तुटली, ज्यामुळे पोटात आतल्या आत खूप रक्तस्त्राव झाला होता आणि मी डाव्या हातावर खाली पडल्यानं माझा हात आणि खुब्याला मार लागला होता.”

यानंतर प्रियदर्शिनी सांगते, “बाहेरून दिसताना माझा फक्त हात दुखत आहे आणि तो फ्रॅक्चर झाला आहे असं वाटत होतं, बाकी ठीक होतं, त्यामुळे तेव्हा सर्वांचं अधिक लक्ष आईकडे होतं; कारण ती तेव्हा खूप गंभीर अवस्थेत होती. ती गाडीत अक्षरश: अडकली होती. नक्की काय झालं हे मला माहीत नाही, पण कदाचित आईला झोप लागली असावी.”

यानंतर ती सांगते, “मला आठवतंय की, मी रस्त्यावर झोपले होते आणि माझे डोळे बंद होते. पण, माझ्या आजूबाजूला खूप लोक जमले असल्याचं मला जाणवत होतं. तेव्हा कोणीतरी माझ्याकडे नंबर मागितला आणि मी त्या अवस्थेत घरचा नंबर सांगितला. त्यावर कॉल केला गेला आणि तो नेमका आजी-आजोबांनी उचलला. मग तिकडे त्यांची अवस्थासुद्धा खराब झाली.”

…तर मी तशीच झोपेत संपले असते : प्रियदर्शिनी इंदलकर

यापुढे प्रियदर्शिनी सांगते, “माझे बाबा चेन्नईला होते, ते तातडीनं इकडे आले. त्यातही ते ज्या विमानाने आले, त्याआधीचं विमान क्रॅश झालं होतं, त्यामुळे तिकडेसुद्धा टेन्शनचं वातावरण होतं. मग शेवटी सगळे हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर बराच काळ मी ‘पोटात दुखतंय’ असं म्हणत होते. त्यावर डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि मग कळलं की, माझी अवस्था अधिक नाजूक आहे. माझे HBS ३ की ४ झाले होते आणि तेव्हा त्याबाबत काही कळलं नसतं तर मी तशीच झोपेत संपले असते.”

पुढे ती म्हणाली, “त्यानंतर सगळे उपचार सुरू झाले. पण, या सगळ्या उपचारात सांगलीचे डॉ. जाधव यांनी त्यावेळी ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी मला सात दिवस फक्त औषधं देऊन रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं माझ्या शरीरानेसुद्धा या सगळ्यात उत्तम साथ दिली आणि मी वाचले.”

यानंतर प्रियदर्शिनीनं सांगितलं, “याच अपघातात माझ्या डाव्या हाताला जखम झाली आणि त्याचा डाग अजूनही आहे, ज्याबद्दल मला अनेकजण विचारतात की हा डाग नक्की कसला आहे; तर तो त्या अपघताचा आहे. पण मी तो डाग मुद्दाम ठेवला आहे. मला तो ऑपरेशन करून लपवावासा नाही वाटत, कारण हा डाग म्हणजे माझ्या पुनर्जन्माची एक निशाणी आहे.”