Prabhakar More Shares Father’s Memory : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना वेगळी ओळख मिळवून दिली. याच विनोदी कार्यक्रमातून प्रभाकर मोरेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘वस्त्रहरण’ या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे ते आणखीनच घराघरांत पोहोचले.

‘कोकणचे पारसमणी’ अशी एक वेगळी ओळख त्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने मिळवून दिली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रभाकर मोरे यांचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अवघ्या जगभरात चाहतावर्ग आहे. परदेशातही त्यांचे लाखों चाहते आहेत. प्रभाकर मोरे हे आज प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. हीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाहण्यासाठी आज वडील हवे होते, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रभाकर मोरे यांनी सोनी मराठीच्या MHJ Unplugged या मुलाखतीच्या विशेष कार्यक्रमात आपली ही इच्छा व्यक्त केली. आज मिळालेलं यश आणि लोकांचं प्रेम पाहण्यासाठी वडील हवे होते, असं म्हणत प्रभाकर मोरेंनी भावुक आठवण शेअर केली आहे. प्रभाकर मोरे म्हणतात, “माझे वडील मला बबन म्हणायचे. मी वडिलांचा खूप लाडका होतो. आज ते असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता.”

यापुढे ते सांगतात, “मी शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमात डान्स किंवा अभिनय करायचो, तेव्हा अनेक लोक वडिलांकडे माझ्याबद्दल कौतुक करायचे. अनेक लोक ‘तुमचा मुलगा खूपच छान काम करतो’, ‘खूप छान डान्स करतो’ म्हणत वडिलांकडे माझं कौतुक करायचे. तेव्हा माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान असायचा. ते एक स्मितहास्य करत माझ्या आईला ‘आपला बबन पुढे जाऊन मोठा कोणीतरी होईल आणि आपलं नाव उज्ज्वल करेल’ असं म्हणायचे.”

प्रभाकर मोरे इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, आपल्या खास शैलीत कोकणी भाषा व त्या भाषेतील विविध भूमिका साकारणारे प्रभाकर मोरे यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. याच शोमध्ये ते ‘शालू झोका दे गो मैना…’ या कोकणी गाण्यावर डान्स करताना दिसतात. अभिनयासह त्यांच्या पारंपरिक कोकणी नृत्याचेही अनेक चाहते आहेत.